वर्धा : भरदिवसा रस्त्यावर झालेल्या हत्याकांडामुळे वर्धा जिल्हा हादरला आहे.धक्कादायक म्हणजे पोलीस क्वार्टरसमोरच आरोपीने दगडाने ठेचून इसमाची हत्या केली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्या झालेल्या मृत व्यक्तीचे नाव विनोद डोमाजी भरणे(४५) असे असून करण मोहिते (२०) असे आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, देवळी शहरात सोनेगाव रस्त्यावर पोलीस वसाहतीच्या समोर भरदिवसा एका इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. आरोपी करण हा दारू पिऊन रस्त्यावर लोकांना पैसे मागत असताना उभ्या असलेल्या महिलेसोबत वाद झाला, महिलेला होत असलेली शिवीगाळ पाहून वाद थांबविण्यासाठी मध्ये आलेल्या विनोद डोमाजी भरणेला रागाच्या भरात त्याने दगडाने ठेचून ठार केले. रस्त्यावर घडणारा हा थरार लोकांच्या कॅमेरात कैद झाला.
View this post on Instagram
आरोपी करण मोहिते हा तरुण देवळी येथील राहणारा आहे. सोनेगाव येथील विनोद डोमाजी भरणे हे काही कामासाठी देवळी येथे आले होते. काम आटोपल्यावर आपल्या गावी परत जाण्यासाठी पोलीस वसाहती समोरील चौकात ऑटोची वाट पहात उभे होते. त्यावेळी करण मोहिते यांने एका महिलेशी वाद घातला. लोकांना पैसे मागत असताना विनोद भरणे यांना देखील पैसे मागितले.
आरोपी करण मोहिते हा मद्यधुंद अवस्थेत बळजबरीने विनोद भरणे यांना पैशाची मागणी केली, यावरून काही वाद झाला. विनोद भरणे हे पायदळ गावाकडे निघाले असता करण मोहिते यांनी मागून जाऊन विनोद मोहिते यांच्या डोक्यावर मोठा दगड मारला. विनोद भरणे हे खाली पडताच आरोपी करणने त्याच्या डोक्यात वारंवार दगडाने हल्ला केला.यात घटनेत भरणे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एक महिला जखमी झाली असून मीरा शालिक मून असे या महिलेचे नाव आहे.
दरम्यान भरदिवसा पोलीस क्वार्टरसमोरच आरोपीने क्रूरपणे हत्या केल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.