‘फ्रेंडशीप डे’ सेलिब्रेशन जीवावर बेतले, तलावात बुडून तिघांचा मृत्यू
नागपूर : देशभर फ्रेंडशीप डे साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावरुन एकमेकांना संदेश पाठवत ‘फ्रेंडशीप डे’ला मित्रांसोबतच्या जुन्या आठवणी जागवल्या जात आहेत. मात्र, नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात असलेल्या तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने हिंगण्यातील सालईमेंढा परिसरावर शोककळा पसरली आहे.
फ्रेंडशीप डे निमित्त तरुणांसह विद्यार्थ्यांकडून आनंंदोत्सव साजरा केला जातो. तर, काही जण पिकनिकचाही प्लॅन करतात. नागपूर शहरातील काही विद्यार्थी रविवारी सायंकाळी पिकनिकच्या निमित्ताने हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात असलेल्या तलावाजवळ आले होते.
त्यातील तिघांना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते तलावात उतरले आणि खोल पाण्यात गेल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. त्यातील एकाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले असून, दोघांची शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
प्रथमेश ऊर्फ गुड्डू सिद्धांत सिडाम (१७, रा. भांडेप्लाट, उमरेड रोड, नागपूर), सागर सुरेश जांबुळकर (१७, रा. भांडेप्लाट, सेवादलनगर, नागपूर व बंटी प्रेमलाल निर्मल (१४, रा. भांडेप्लाट, उमरेड रोड नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.
या तिघांसह त्यांचे अन्य पाच मित्र फ्रेंडशीप डे निमित्त हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात तलावाजवळ फिरायला आले होते. दरम्यान, या तिघांना पोहण्याचा मोह झाला आणि ते तलावात उतरले. उर्वरित पाच जण काठावर उभे होते. पाहता पाहता तिघेही खोल पाण्यात गेले आणि गटांगळ्या खाऊ लागले.