Published On : Mon, Apr 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील अथर्व नानौरे हत्याकांड प्रकरणी शेजाऱ्यासह तीन आरोपींना अटक

गिट्टीखदान पोलीसांसह गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
Advertisement

नागपूर : शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय अथर्व नानौरे हत्याकांडाचा अखेर पोलिसांनी उलगडा केला आहे. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींचे वय २० ते २२ वर्षांच्या दरम्यान आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी हा अथर्वचाच शेजारी असल्याचे समोर आले आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेदरम्यान अथर्व अचानक बेपत्ता झाला होता. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली, मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला दिशा मिळाली.

दरम्यान, अथर्वचा मृतदेह कळमेश्वर हद्दीत भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत एका गोणीत हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर शहरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले होते.

तपासादरम्यान अथर्व शेवटचा दोन मित्रांसोबत आईस्क्रीम पार्लरजवळ दिसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपींनी त्याला अशा ठिकाणी नेले, जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Advertisement

घटनास्थळी सापडलेल्या पोत्यावरील ट्रेडमार्क हा तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरला. त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. प्राथमिक चौकशीत वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाला वेग दिला होता. सध्या तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपासात या भीषण हत्येमागील नेमकं कारण उघड होण्याची शक्यता आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.