
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईतील विधान भवनाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे ही धमकी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसरात तपास मोहीम सुरू केली आहे.
धमकीचा संदेश मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथकासह सुरक्षा यंत्रणांनी विधान भवन आणि परिसराची सखोल तपासणी सुरू केली आहे. कोणताही धोका टाळण्यासाठी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने विधान भवन परिसरात मंत्री, आमदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी इमारतीत प्रवेशावर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी धमकीचा ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे. ही धमकी केवळ खोडसाळपणा आहे की त्यामागे कोणता गंभीर कट आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.








