
या मोर्चाला शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, समाजवादी पार्टी व माकपानेही पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचा मोर्चा दीक्षाभूमी परिसरातून निघाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा धनवटे कॉलेजच्या मैदानावरून निघाला आहे. दोन्ही मोर्चे लोकमत चौकात एकत्र येऊन पुढे झिरो माईल टी पॉर्इंटवर जाहीर सभा होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राज्यभरातील नेते सहभागी झाले आहेत.
गेल्या महिनाभरापासून दोन्ही पक्षांनी या मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतून शेकडो गाड्या सकाळी मोर्चेकऱ्यांना घेऊन दाखल झाल्या. ग्रामीण भागातील, शेतकरी, शेतमजूर, महिला मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाले आहेत.








