Published On : Wed, Jul 25th, 2018

लकडगंज झोनमध्ये तीन हजार महिलांनी दिला सक्षमीकरणाचा नारा

नागपूर: लकडगंज झोनमध्ये बुधवारी सुमारे अडीच ते तीन हजार महिलांनी सक्षमीकरणाचा नारा दिला. नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बुधवारी (ता. २५) लकडगंज झोनमधील महिला बचत गटांच्या सदस्यांकरिता ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानांतर्गत लकडगंज झोनमधील प्रीतम भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

शहरी महिला बचत गटातील महिलांना लघुउद्योगाचे धडे देत त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या अभियाला सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, नगरसेविका चेतना टांक, मनिषा ढवळे, कांताताई रारोकर, जयश्री रारोकर, वैशाली रोहनकर, सरीता कावळे, दीपक वाडीभस्मे उपस्थित होते.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, आजच्या आधुनिक युगात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र आजही काही बंधने त्यांना घराबाहेर पडून स्वत:ची ओळख निर्माण करण्यास रोखत आहे. मात्र लकडगंज झोनमधील कार्यक्रमातील महिलांची विक्रमी गर्दी पाहता सर्व बंधने झुगारून महिला सक्षमीकरणासाठी सज्ज झाल्या आहेत, असे ते म्हणाले.

सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, सक्षमपणे कुटुंबाचा भार वाहणा-या महिलांमध्ये व्यवस्थापनाचे कौशल्य जन्मजातच असते. लघु उद्योग हा स्त्रीच्या उन्नतीचा मार्ग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या व्यवसायात योग्य भरारी घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिलांच्या उत्थानासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. बँकांकडून मिळणारे सहकार्य व करता येउ शकणारी विविध कामे याची माहिती एकत्रितरित्या मिळावी, यासाठी प्रत्येक झोनमध्ये अभियानाची ओळख करून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

स्वयं सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घेत अभियानात सहभागी व्‍हावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला लकडगंज झोनचे चारही समुह संघटक यांच्यासह श्री. बागडे, श्रीमती उजवणे, प्रमोद खोब्रागडे यांच्यासह झोनमधील बचत गटांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. यावेळी सभागृहात लघुउद्योगामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.