Published On : Mon, Aug 14th, 2023
By Nagpur Today Nagpur News

देशभक्तीच्या उत्साही वातावरणात हजारो नागरिकांनी घेतली ‘सामूहिक पंच-प्रण प्रतिज्ञा’

- ७ हजार ५०० दीप प्रज्वलनाने उजळला फुटाळा तलाव परिसर| - योगासन व मल्लखांब प्रात्यक्षिका ठरल्या आकर्षणाचे केंद्र
Advertisement

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत मातृभूमीविषयीचे प्रत्येक भारतीयाचे प्रेम आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांविषयीचा अभिमान व्यक्त करणारे ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात माझी माती माझा देश अभियान नागपूर महानगरपालिकाद्वारा राबविण्यात येत आहे. यानिमित्त फुटाळा तलाव परिसर येथे सोमवारी (ता.१४) देशभक्तीच्या भावनेने ओत-प्रोत अशा वातावरणात हजारो नागरिकांनी ‘सामूहिक पंच-प्रण प्रतिज्ञा’ घेत राष्ट्राप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. याप्रसंगी ७ हजार ५०० दीप प्रज्वलनाने संपूर्ण फुटाळा तलाव परिसर रोषणाईने उजळला.’भारत माता की जय’ आणि वंदे मातरम च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला.

कार्यक्रमात मध्य नागपूरचे आमदार श्री. विकास कुंभारे, माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. मनोजकुमार सूर्यवंशी, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती. आंचल गोयल, पोलीस उपायुक्त श्री. अनुराग जैन, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार श्री. यादवराव देवगडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रीमती लीलाताई चितळे, 213 सीआरपीएफ महिला बटालियनच्या कमांडर लता श्रीनिवास, श्रीमती चौधरी मंचावर उपस्थित होते.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते “वीरों का वंदन” उपक्रमांतर्गत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार श्री. यादवराव देवगडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लिलाताई चितळे, शहीद शंकर महाले यांच्या कुटुंबातील श्रीमती. गीता महाले, श्री. स्वप्नील महाले. हुतात्मा एएसआय नरेश बडोले यांच्या कुटुंबातील श्रीमती प्रमिला नरेश बडोले, हुतात्मा नायक बाबुराव डोंगरे यांच्या कुटुंबातील श्रीमती वंदना डोंगरे, हुतात्मा नायक तेजराव दंदी यांच्या कुटुंबातील श्रीमती इंदुमती दंदी, हुतात्मा नायक सुनील काशीराम नखाते यांच्या कुटुंबातील श्रीमती कल्पना नखाते यांचा नागपूर महानगरपालिकेचा मानाचा दुपट्टा, सन्मान चिन्ह व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात ‘मेरी माटी मेरा देश अभियानाचे नोडल अधिकारी उपायुक्त श्री.सुरेश बगळे यांनी ‘आम्ही शपथ घेतो की’ म्हणत उपस्थितांना ‘सामूहिक पंच प्रण प्रतिज्ञा’ दिली. हजारो नागरिकांनी एकस्वरात ‘सामूहिक पंच प्रण प्रतिज्ञा’ घेतली, ‘भारत माता की जय’ असा जयघोष होताच देशभक्तीच्या भावनेने उर भरून आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व आर जे. राजन यांनी केले. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. निर्भय जैन, ‘मेरी माटी मेरा देश अभियानाचे नोडल अधिकारी उपायुक्त श्री. सुरेश बगळे, श्री. रवींद्र भेलावे, निगम सचिव श्री. प्रफुल्ल फरकासे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, सहायक आयुक्त सर्वश्री मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, महेश धामेचा, हरीश राऊत, गणेश राठोड, समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता सर्वश्री. रवींद्र बुंधाडे, गिरीश वासनिक, विजय गुरुबक्षाणी, उज्वल धनविजय, क्रीडा अधिकारी श्री. पियुष आंबुलकर यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी व भोसला मिलिट्री स्कूल, मनपा शाळातील विद्यार्थी, 213 सीआरपीएफ महिला बटालियनचे जवान, महिला बचत गटांच्या सदस्या प्रामुख्याने उपस्थित होते.

चित्तथरारक मल्लखांब व योगासन प्रात्यक्षिके

देशभक्तीच्या वातावरणात वीरांगणा क्रीडा व सांस्कृतिक मंडळच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली. तर अमित हायस्कूल व नेहरू क्रीडा मंडळच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक योगासन प्रात्यक्षिके सादर केले. तर मॅट्रिक वॉरिअर्स संस्थेच्या सदस्यांनी ७ हजार ५०० दीप प्रज्वलीत करीत संपूर्ण परिसर रोषणाई केली. तसेच उपस्थितांनी लाईट अँड साउंड शो चा आनंद घेतला.

Advertisement
Advertisement