Published On : Fri, Jun 15th, 2018

यंदाचा महिला उद्योजिका मेळावा दिवाळीपूर्वीच होणार

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाद्वारे दरवर्षी घेण्यात येणारा महिला उद्योजिका मेळावा हा दिवाळी पूर्वी घेण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी दिली आहे. शुक्रवार (ता.१५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित महिला व बालकल्याण समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी समिती उपसभापती विशाखा मोहोड, मनपाच्या प्रतोद आणि समिती सदस्य दिव्या धुरडे, सदस्या सरिता कावरे, रश्मी धुर्वे, वैशाली नारनवरे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, दरवर्षी हा महिला उद्योजिका मेळावा दिवाळीनंतर आयोजित केला जातो. यावर्षी दिवाळीमध्ये लागणा-या वस्तुंची निर्मिती नागपूर महानगरपालिकेच्या नोंदणीकृत महिला बचत गटाकडून तयार करून घेण्यात येणार असून त्याची विक्री महिला उद्योजिका मेळाव्यात करण्यात येणार असल्याची माहिती प्रगती पाटील यांनी दिली.

महिला व बालकल्याण समितीद्वारे वृध्दाश्रम तथा विरंगुळा केंद्र तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. याबबात स्थावर विभागाने आश्रमासाठी जागा उपलब्ध तयार करून दिली आहे. त्या जागेची सर्व समिती सदस्यांनी पाहणी करावी, अशी सूचना सभापती प्रगती पाटील यांनी केली. जागेसाठीची प्रक्रीया आणि त्यांनतरच्या कार्यवाहीची तयारी करण्यात यावी, अस निर्देश प्रशासनाला सभापतींनी दिले. वृद्धाश्रम कम अनाथाश्रम तयार करून त्यासाठी शासनाचे अनुदान तयार करण्यासाठी काय प्रक्रिया आहे, याची माहिती उपसभापती विशाखा मोहोड यांनी दिली. यासंबंधीच्या अटीमध्ये वयोमर्यादेची अट महत्वाची आहे. वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमासाठी शासनाचे जे नियम आहे, त्यानुसारच याची कार्यवाही करावी, असे निर्देश सभापती प्रगती पाटील यांनी दिली.

नागपूर महानगपालिकेच्या शाळेत महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून सॅनेटरी नॅपकीन व्हेडींग मशीन्स लावण्यात येत आहे. महापालिकेच्या दोन शाळेत ज्या शाळेत विद्यार्थीनींची संख्या जास्त आहे. अशा शाळेत ही कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश सभापती प्रगती पाटील यांनी केली.

शहरातील महिलांना स्वयंरोजगार आणि स्वालंबित करण्यासाठी वैयक्तीगत व्यवसायाकरीता चाय बाईक ही संकल्पना महिला व बालकल्याण समितीने मांडली आहे. महिलाला बाईक स्वरूपात द्यावी, यावर ती चहाचा व्यवसाय करेल, अशी प्रायोगिक तत्तावर बाईक खरेदी करण्यात येत आहे. त्यांनतर दहा झोन मध्ये प्रत्येकी एक बाईक घेण्यात येईल. सध्याच्या स्थितीत एक बाईक घेण्याचा प्रस्ताव समितीचा आहे. ईश्वर चिठ्ठीने लाभार्थ्यांचे नाव घोषित केले जाईल, अशी माहिती सभापती प्रगती पाटील यांनी दिली.

पथविक्रेता धोरणाबाबत बाजार विभागाने केलेल्या २०१७-१८ कार्यवाहीचा आढावा सभापती पाटील यांनी बाजार अधीक्षक मदन सुभेदार आणि सहायक आयुक्त विजय हुमने यांच्यामार्फत घेतला. सर्वपक्षीय नगरसेविकांचा प्रशिक्षण दौरा आयोजित करण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा झाली. सर्वांनी स्थान सूचित करावे, असे सभापती श्रीमती पाटील यांनी निर्देशित केले. महिला बचत गटांद्वारे मनपा मुख्यालयात फुड स्टॉल, झेरॉक्स मशीन्स लावण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत आढावा सभापतींनी घेतला. शहराच्या केंद्रस्थानी बचत गटाद्वारे उपहारगृह तयार करण्यात येणार आहे. ज्या रेल्वेंमध्ये पँट्री कार नसते त्यामध्ये महिला व बचतगटांच्या महिला जेवण्याचा डब्बा देणार आहे, या बाबत रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रगती पाटील यांनी दिली.