नागपूर : येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीश विजय मुरकुटे यांच्या दाराजवळची ग्रील तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ऐनवेळी घरातील मंडळी जागी झाल्यामुळे चोरीची घटना टळली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली.
जिल्हा न्यायाधीश पदावरून मुरकुटे चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले. सध्या ते लोक न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून सेवा देत आहेत. प्रतापनगरातील दुर्गा माता मंदिरासमोर असलेल्या गिट्टीखदान लेआऊटमध्ये त्यांचे दुमजली निवासस्थान आहे. खालच्या माळ्यावर ते आणि त्यांची पत्नी जयमाला मुरकुटे राहतात. नेहमीप्रमाणे रविवारी मुरकुटे दाम्पत्य जेवण केल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास झोपी गेले. त्यांनी आपल्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या ग्रीलसमोर कार लावली होती. कारचा आडोसा घेत रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी घरात शिरण्यासाठी मोठ्या रॉडने ग्रीलचे लोखंडी बार उचकावून ग्रील तोडण्याचा प्रयत्न केला. नेमक्या वेळी जयमाला मुरकटे यांना जाग आली.
त्यांनी घरातील लाईट लावल्याचे बघून चोरट्यांनी तेथून पळ काढला. या प्रकारापासून अनभिज्ञ असलेले मुरकुटे दाम्पत्य नेहमीप्रमाणे पहाटेच्या वेळी जागे झाले. ते घराबाहेर आले तेव्हा चोरट्यांनी ग्रील तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. निवृत्त न्यायमूर्तींकडे चोरीचा प्रयत्न झाल्याचे कळताच बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. त्यांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर चोरट्यांचा शोध लागला नव्हता.
