नवी दिल्ली – देशातील लाखो वाहनचालकांसाठी एक आशादायक बातमी आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचित केले आहे की, आगामी दहा दिवसांत देशाच्या टोल धोरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे प्रवाशांवरील खर्चात मोठी घट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
टोल सिस्टीममध्ये बदलांची चाहूल –
गडकरी म्हणाले, “सरकारच्या ध्येयांपैकी एक म्हणजे टोल प्रणाली पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवणे. काही मार्गांवरील टोल पूर्णपणे रद्द केला जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी टोल कपात केली जाणार आहे.” नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टोल संकलन अधिक अचूक आणि सुलभ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारचा कटाक्ष –
देशात दरवर्षी होणाऱ्या लाखो रस्ते अपघातांबाबत गडकरींनी चिंता व्यक्त केली. “रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, परंतु रस्त्यांची गुणवत्ता, अपूर्ण अभियांत्रिकी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन ही मोठी आव्हाने आहेत,” असे ते म्हणाले. अपघात कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वतःचा अनुभव सांगत नियमांचे महत्त्व अधोरेखित-
नियम सर्वांसाठी एकसारखे असावेत, हे स्पष्ट करताना गडकरींनी सांगितले की, वांद्रे-वरळी सी लिंकवर वाहतूक नियम मोडल्यामुळे त्यांनाही दंड भरावा लागला होता. “मंत्री असलो तरी कायद्यापासून सूट नाही,असा संदेश देत त्यांनी नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन केले. नागपूरमधील एका प्रसंगाचा उल्लेख करत गडकरी म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ वर्तनामुळे देशाची प्रतिमा मलीन होते. “शिस्त ही शिक्षणातूनच नव्हे, तर घरातल्या संस्कारांमधून घडते, असे मत त्यांनी मांडले.