
नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंधन तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल माध्यमांवर पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत नागरिकांना दिलासा दिला आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशा बातम्या व्हायरल होत होत्या. या अफवांमुळे पुणे आणि इतर काही मोठ्या शहरांतील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “चुकीची माहिती पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम आहे. देशाची ऊर्जा सुरक्षितता कायम राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.”
दरम्यान, पेट्रोल-डिझेल पुरवठ्याबाबत सरकारकडून दिलासा मिळत असला तरी स्वयंपाक गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात १५० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने हॉटेल व्यवसायिकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
याशिवाय काही भागांमध्ये गॅस सिलेंडरच्या वितरणावर दिवसानुसार मर्यादा घालण्यात आल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रारही पुढे येत आहे.








