Published On : Sat, Oct 6th, 2018

शिक्षणासोबतच नाविन्यपूर्ण कल्पनेवर भर देण्याची गरज

Advertisement

नागपूर: शिक्षणासोबतच नव्या नाविन्यपूर्ण कल्पनेला भर देण्याची गरज आहे. कौशल्यपूर्ण विकासावर भर कसा देता येईल यावरही विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा, असा उपदेश केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केला. नागपूर महानगरपालिका, इंडियन कॉन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च ॲण्ड डेव्हल्पमेंट आणि नवयुवक इंटरप्राईजेस यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (ता.६) ला कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्टार्ट अप फेस्टचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा.अनिल सोले, माजी खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रमोद येवेले, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, कार्यकारी संचालिका श्वेता शालिनी, युवा मार्गदर्शक शिवानी दाणी, देवेंद्र दवे, कार्यक्रमाचे समन्वयक केतन मोहितकर, गौरव मिश्रा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, जीवन जगताना काहीतरी करून दाखविण्याची इच्छाशक्ती मनामध्ये असायला हवी. इच्छाशक्तीपाठोपाठ आपण काय नाविन्यपूर्ण काम केले पाहिजे याचा देखील विचार करायला हवा. याच नाविन्यपूर्ण कल्पना आम्ही देखील राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. कच-यापासून वीज निर्मिती, त्यापासून ऑर्गेनिक खत तयार करणार आहे. दिल्ली येथून ५० हजार टन खत आणून त्यावर रासायनिक प्रक्रीया करून तयार झालेले ते खत विदर्भातील शेतक-यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मलनिःसारण प्रक्रीयेपासूनही इंधन तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. सांडपाण्यातून मिथेन गॅस निघतो. त्या मिथेन गॅसला रासायनिक प्रक्रीया करून बायो फ्युयेल तयार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. पेट्रोल, डिजेलचे भाव गगनाला भिडले आहेत. म्हणून त्याला पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. विदर्भात निघणारे धानाचे तणसापासून इथेनॉल तयार करण्यात येणार आहे. १ टन तणसापासून सुमारे २८० लिटर इथेनॉल तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

येत्या वर्षभरात ५० हजार युवकांना रोजगार
येत्या काही काळात नागपुरात मिहान विकसित होत आहे. मिहानमध्ये एचसीएल, टीसीएस, इनफोसिस यासारख्या नामांकित कंपन्या सुरू झाल्या आहेत. या कंपन्यांमार्फत येत्या वर्षभरात विदर्भातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाका-याने वर्षभरात ५० हजार युवकांना रोजगार निर्माण होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात नोकरीविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. युवकांच्या मनातील प्रश्न हे स्वाभाविकच असतात. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी आपला कौशल्य विकास करणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यपूर्ण ज्ञानाला बळ देण्याचे काम स्टार्टअप फेस्ट या कार्यक्रमाच्या माध्यामातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी गणेश वंदना व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतन मोहितकर यांनी केले. कार्यक्रमामागील पार्श्वभूमी गौरव मिश्रा यांनी सांगितले. संचालन व आभार रेणुका देशकर यांनी केले.

या कार्यक्रमात ‍Building startup ecosysteam in Nagpur आणि Startup idea through Social media &Glamour या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.