Published On : Mon, Oct 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात थंडीची प्रतीक्षा लांबणार! बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा विदर्भालाही फटका?

Advertisement

महाराष्ट्रात थंडीची प्रतीक्षा लांबणार! बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा विदर्भालाही फटका?

नागपूर : राज्यात सध्या उकाड्याचा त्रास कायम असतानाच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही होऊ शकतो. विशेषतः २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची, तर गुरुवारी काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे काही राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. संभाव्य चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत, तर काही अंदाजांनुसार १३० ते १४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा थेट धोका नसला, तरी हवामानातील बदलांचा परिणाम राज्याच्या काही भागांत जाणवू शकतो.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीची प्रतीक्षा?
राज्यातील नागरिकांना आता थंडीची चाहूल लागली असली, तरी प्रत्यक्ष थंडी सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. उत्तर भारतातील काही भागांत सकाळी आणि रात्री गारवा जाणवू लागला आहे. मात्र, महाराष्ट्रासह मध्य भारतात अद्याप उकाडा कायम आहे.

राज्यातील काही भागांत किमान तापमानात घट होत असली, तरी बहुतांश ठिकाणी ते सरासरीपेक्षा १ ते २ अंश सेल्सिअस अधिक नोंदवले जात आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, दक्षिण गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीची प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

हिवाळ्यातही उकाड्याचा त्रास?
यंदाच्या हिवाळ्यात ‘एल निनो’चा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तापमानात अपेक्षित घट न झाल्यास हिवाळ्यातही उबदार हवामान आणि उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. पुढील काही दिवस राज्याच्या बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता असली, तरी विदर्भातील पावसाच्या अंदाजामुळे वातावरणात बदल होऊ शकतो. त्यामुळे आता पाऊस आणि थंडीची सुरुवात नेमकी कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.