नवी दिल्ली – देशभरात आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, राजधानीतील जुन्या संसद भवनात राष्ट्रीय कार्यक्रम पार पडला. संविधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अध्यक्षस्थानी होते. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि दोन्ही सभागृहांचे खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी संविधानाच्या नऊ भारतीय भाषांतील अनुवादित आवृत्त्यांचे प्रकाशन करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले. मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मिरी, तेलुगू, ओडिया आणि आसामी भाषांतील संविधानाचे संकलन आज प्रथमच सार्वजनिकरित्या सादर करण्यात आले.
राष्ट्रपतींनी यावेळी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली आणि भारताच्या लोकशाही परंपरेतील तिच्या महत्त्वावर भाष्य केले. प्रस्तावना वाचनादरम्यान सभागृहात उपस्थित मान्यवरांनी एकात्मतेची भावना अनुभवली.
“भारत आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आदर्श बनला आहे,” असे सांगताना राष्ट्रपतींनी संसदेच्या गेल्या दशकातील कार्याचे विशेष कौतुक केले. तिहेरी तलाकसारख्या प्रथांवर बंदी घालून महिलांना न्याय मिळवून देण्यात संसदेनं घेतलेल्या ऐतिहासिक भूमिकेचा त्यांनी उल्लेख केला.
“विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्णत्वास जाईल,” असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या, “आजचा दिवस विशेष आहे, कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ह्याच सभागृहात संविधान सभेने भारतीय संविधानाचा मसुदा अंतिम केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले हे संविधान आजही आपल्या राष्ट्राचे दिशा-दर्शक आहे.”
संविधान दिनाचे औचित्य साधत राष्ट्रपतींनी नागरिकांना लोकशाही मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आणि संविधानातील तत्त्वे जपून पुढील पिढीसाठी सशक्त राष्ट्र निर्माण करण्याची गरजही व्यक्त केली.










