Published On : Mon, Jul 12th, 2021

एका चुकीतून आवळतोय ‘सेक्सटॉर्शन’ चा फास : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

Advertisement

सोशल मिडियातून नव्या गुन्हेगारीचे पर्व. चॅट, व्हीडीओ कॉलिंगमुळे वाढतोय धोका.

 

नागपूर: सोशल मिडियावरील मैत्री आता आणखीच धोकादायक ठरत असून अऩेकजण एकमेकांबद्दल कळत-नकळत तयार होणारे आकर्षणातून नवे संकट ओढवून घेत असल्याचे दिसून येत आहे. एकाकीपणा घालविण्यासाठी सुरू केलेल्या चॅटिंगचा प्रवास व्हीडीओ कॉलपर्यंत जाऊन पोहोचत असून आभासी शारिरीक समाधानाची मागणी वाढत आहे. विविध अनधिकृत व्हिडीओ रेकॉर्ड अप्लिकेशनचा वापर करून संभाषण रेकॉर्ड केले जाते, यातूनच स्त्री किंवा पुरुषांभोवती सेक्सटॉर्शनचा फास आवळला जात असल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे.

सोशल मिडिया, विशेषतः फेसबूकवर आतापर्यंत एखाद्याची फेक आयडी तयार करून त्याच्या मित्रांकडून पैशाची मागणी करणाऱ्या अनेक घटना पुढे आल्या आहे. आता सोशल मिडियाचा गुन्हेगारीसाठी किंवा आर्थिक वसुली करणाऱ्यांनी त्याही पुढे पाऊल टाकले असून ते आयुष्य उद्‍ध्वस्त करणारे असल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांंनी सांगितले. फेसबूकवर यूजरच्या पोस्टवरून त्याचा स्वभाव, गरजा, मानसिकता, मित्र, परिवार, सामाजिक प्रतिमा याचा अभ्यास केला जात आहे.

त्यातून यूजरचे कमकुवत दुवे शोधले जात असून त्यानंतर फेक आयडीद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. एकदा पुरुष किंवा स्त्रीकडून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली की दररोज मैत्रीपूर्ण चॅटिंग, पुढे अश्लिल चॅट व नंतर व्हीडीओ कॉलसाठी आग्रह धरला जातो. त्यानंतर पुरुषांंना जाळ्यात ओढण्यासाठी स्त्री किंवा स्त्रीयांना जाळ्यात ओढण्यासाठी पुरुष गुन्हेगारांकडून भावनिक प्रयत्न केले जाते. एवढेच नव्हे पुरुष गुन्हेगारच बरेचदा व्हाईस मॉड्यूलर सॉफ्टवेयर वापरून महिलांच्या आवाजात ऑडिओ कॉलवर संभाषण करतात. लैंगिक मुद्यांवर व्हिडीओ कॉलवर बोलणे सुरू करत थेट आभासी शारिरिक समाधानासाठी तयार केले जाते.

विविध अनधिकृत व्हिडीओ रेकॉर्ड अप्लिकेशन, दुसरा मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रिन रिकॉर्डिंग अप्लिकेशनचा वापर करून ते रेकॉर्ड केले जाते. फेक वेबसाईट तयार करून या रेकॉर्ड केलेल्या क्लिप तात्पुरत्या स्वरुपात त्यावर टाकून त्याची लिंक दाखवून ब्लॅक मेल केले जात आहे. त्यामुळे विशेषतः पुरुषांनी महिलांच्या नावाने येणाऱ्या अशा फेक आयडीवरून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्टबाबत सावध होण्याची गरज त्यांंनी व्यक्त केली. शहरातही अशा घटना घडल्या असून प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याने कुणीही याबाबत शब्दही काढत नसल्याची चर्चा आहे.

केवळ महिला नव्हे तर कमावते असल्याने पुरुषही मोठ्या संख्येने ‘सेक्सटॉर्शन’चे बळी ठरत आहे. यात सातत्याने ब्लॅकमेलिंगमुळे आर्थिक नुकसान होतेच, शिवाय प्रतिष्ठाही धुळीस मिळण्याची शक्यता आहे. महिलांना या गुन्हेगारांकडून चक्क वेश्या व्यवसायाकडे ढकलले जाण्याची भीती आहे. प्रतिष्ठेच्या भीतीने पोलिसांकडे कुणीही जात नाही. त्यामुळे सोशल मिडियावर सावधगिरी बाळगणे हाच एक पर्याय आहे.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.

www.ajeetparse.com