नागपूर : सोमवारी सायंकाळी वर्धा रोडवरून जात असताना अजनी चौकात बलेनो कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेच्या पथकाने अखेर आगीवर नियंत्रण मिळविले.ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
आरटीओ जवळील प्रियदर्शनी नगर येथील रहिवासी असलेले पीयूष अग्रवाल हे कार (एमएच-३१/एफए/३४०६) सहकाऱ्यासह रहाटे कॉलनी चौकमार्गे लक्ष्मी नगरकडे जात होते. अजनी चौकात ट्रॅफिक सिग्नल लागल्याने अग्रवाल यांनी त्यांची गाडी सिग्नलवर थांबवली. दरम्यान, त्यांच्या गाडीच्या हुडमधून धूर निघू लागला. यानंतर कारमधून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. अग्रवाल आणि साथीदार लगेच गाडीतून बाहेर पडले. गाडीचे इंजिन, टायर आणि पुढचा भाग आगीत जाळून खाक झाला. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीमागचे नेमके कारण तपासले जात आहे.