Published On : Fri, Nov 20th, 2020

वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचे घुमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

Advertisement
Electricity Bill

Representational pic

लॉकडाऊनच्या ३ महिन्यांच्या काळात जनतेला अवास्तव वाढीव वीज बिले देण्यात आली होती. वीजबिलात माफी अथवा सवलत मिळावी, अशी सर्वांची मागणी होती. त्यानंतर ग्राहकांना दिलासा देणार, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती.

वीजबिल माफी मिळणार असे असतांना सरकारने आज घुमजाव केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री/वित्तमंत्री यांनी दिलासा देणे शक्य नव्हते तर वीजबिल सवलतीची घोषणा का केली, असा सवाल कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे.

आधी वाढीव बिले कमी करावीत. आधीच वीज दर वाढले आहेत. वाढीव बिलात दिवाळीपूर्वी सवलत देऊ, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते, परंतु आता सरकारने जनतेला ठेंगा दाखविला आहे. वीजबिलात कोणतीही सवलत मिळणार नाही, असे राज्याचे उर्जामंत्री श्री. नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

खरेतर उर्जामंत्र्यांनी वीजबिल माफी व सवलतीसाठी भरपूर प्रयत्न केलेत. परंतु, त्यांना हवा तसा पाठिंबा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री/वित्तमंत्र्यांकडून मिळाला नाही. कॉंग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न दिसतोय. जनतेला दिलासा देणाऱ्या घोषणेची पूर्तता करावी, अशी मागणी डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे. वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचे घुमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. *काँग्रेसने जनतेच्या हितासाठी सरकारला शॉक देण्याची तयारी ठेवावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली