Published On : Mon, Jun 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

ठाकरे बंधूंचा दबाव कामाला आला; सरकारची माघार ही मराठी विजयाची नांदी; संजय राऊतांचे विधान

Advertisement

मुंबई : हिंदी सक्तीविरोधातील लढ्याला मोठं यश मिळालं असून राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांची एकजूट हीच सरकारसाठी मोठा धसका ठरली. “राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि अवघ्या १० मिनिटांत उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद आला. यामुळे सरकार हादरलं आणि निर्णय मागे घ्यावा लागला,” अशी टीका उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत म्हणाले, “हे फक्त लढ्याची सुरुवात आहे. ठाकरे बंधूंची ताकद ही मराठी जनतेची ताकद आहे. आता प्रत्येक मुद्द्यावर मराठीसाठी ही एकजूट दिसेल आणि प्रत्येकवेळी सरकारला झुकवावं लागेल.”

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत विचारलं, “फडणवीस-शिंदे, फडणवीस-मुश्रीफ, फडणवीस-पटेल एकत्र येऊ शकतात, मग दोन भाऊ एकत्र आले तर विरोधकांना पोटदुखी का होते?” ते पुढे म्हणाले, “भूतकाळ उकरू नका. कोण वाढतंय, कोण संपतंय, हे लवकरच स्पष्ट होईल.”

फडणवीसांवर पलटवार –
भाजपकडून वारंवार दावा केला जात आहे की त्रिभाषा सूत्राचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारला गेला होता. यावर राऊतांनी स्पष्ट प्रत्युत्तर दिलं – “फडणवीस खोटं बोलत आहेत. माशेलकर अहवाल टेबलवर ठेवा. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती का तयार केली? अभ्यास करून निर्णय घेणे हेच सरकारचं कर्तव्य आहे.”

५ जुलैचा विजयी जल्लोष ठरलेला –
संजय राऊत म्हणाले की, “५ जुलैचा मोर्चा हा केवळ आंदोलन नव्हे, तर मराठी अस्मितेचा विजयी जल्लोष असेल. राज ठाकरे सहभागी होणार का, यावर माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. दोन्ही पक्षांनी तयारी पूर्ण केली आहे. सगळ्या घटकांना एकत्र घेऊन हा मेळावा साजरा होईल.”

सरकारचा माघार म्हणजे शहाणपणाचा निर्णय –
“हिंदी सक्ती मागे घेऊन फडणवीसांनी पहिल्यांदाच शहाणपण दाखवलं,” असा टोलाही त्यांनी लगावला. “सरकारने समित्यांचा खेळ थांबवावा. आम्ही त्रिभाषा सूत्र कदापि मान्य करणार नाही. मराठी माणसाची ही ताकद असून, ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आता सरकारला वारंवार झुकावं लागेल,” असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement