
नागपूर : नागपूरच्या इतिहासातील वेदनादायी गोवारी शहीद स्मृतीदिनानिमित्त ११४ शहीद गोवारी बांधवांना महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आदिवासी गोवारी शहीद स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी शहीदांच्या संघर्ष, त्याग आणि बलिदानाचे स्मरण केले.
आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करताना ११४ गोवारी बांधवांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या त्यागाला विनम्र अभिवादन करत शहीदांचे बलिदान आणि संघर्ष कधीही विसरता येणार नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. गोवारी समाजाच्या प्रश्नांबाबत शासन संवेदनशील असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सकारात्मक असल्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शहीदांच्या स्मृती जतन करणे आणि त्यांचा संघर्षमय इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. गोवारी शहीदांच्या बलिदानातून समाजाच्या हक्कांसाठीचा संघर्ष आणि त्यागाची भावना कायम प्रेरणा देत राहील, असे यावेळी सांगण्यात आले.



