Published On : Fri, Mar 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्यात मद्यसाठ्यावर टंचाईची टांगती तलवार; पेट्रोल-गॅसनंतर आता दारू उद्योगही अडचणीत

Advertisement

नागपूर -राज्यात इंधन आणि गॅस टंचाईनंतर आता मद्य उद्योगावरही संकटाचे ढग दाटले आहेत. इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणाम स्थानिक उद्योगांवर जाणवू लागला आहे. सुरुवातीला एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भासल्याने हॉटेल आणि खानावळ व्यवसाय अडचणीत आले, त्यानंतर पेट्रोलच्या कमतरतेमुळे पंपांवर लांबच लांब रांगा दिसू लागल्या. आता काचेच्या बाटल्यांचा पुरवठा खंडित झाल्याने मद्यनिर्मितीवर थेट परिणाम होत असून, राज्यात अवघ्या काही दिवसांचाच साठा उरल्याची माहिती पुढे येत आहे.

काच उद्योग ठप्प होण्याची भीती बिअर, सलाईन आणि इतर उत्पादनांसाठी लागणाऱ्या काचेच्या बाटल्या तयार करणाऱ्या ‘कॅनपॅक’सारख्या कंपन्यांना एलपीजी गॅसचा तुटवडा भासत आहे. काच वितळवण्यासाठी लागणारी भट्टी सतत उच्च तापमानावर ठेवावी लागते. ही प्रक्रिया अचानक थांबवणे शक्य नसल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. उद्योग तज्ञांच्या मते, भट्टी बंद पडल्यास कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते.

तांत्रिक अडचणींमुळे वाढले संकट काचेच्या उत्पादनासाठी भट्टीचे तापमान सुमारे १७०० अंश सेल्सिअसपर्यंत नेले जाते. हे तापमान कमी करण्यासाठी किमान एक महिना लागतो, तर पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सहा महिन्यांपर्यंत कालावधी लागू शकतो. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया थांबवणे उद्योगांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात एलपीजीची गरज भासत असून सध्या उपलब्ध साठा अत्यंत मर्यादित असल्याची माहिती समोर येत आहे.
कामगारांवरही संकटाचे सावट या उद्योगांमध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. गॅस पुरवठा खंडित झाल्यास कारखाने बंद पडण्याची शक्यता असून त्यामुळे रोजगारावरही गदा येऊ शकते. तसेच काचेसोबतच अॅल्युमिनियम कॅन तयार करणाऱ्या उद्योगांनाही याचा फटका बसत आहे.

सरकारकडे धाव उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत राज्य सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांकडे निवेदन सादर केले आहे. पुरवठा साखळी सुरळीत न झाल्यास राज्याच्या महसूलावरही मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एकूणच, इंधन संकटाचे पडसाद आता मद्य उद्योगापर्यंत पोहोचले असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.