नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांना समज देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाने १९ मार्च २०२४ रोजी पक्ष चिन्हाबाबत दिलेल्या अंतरिम आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी सुनावणी सुरू होताच अजित पवार गटाने छापलेल्या काही जाहिराती, पोस्टर्स, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावरील जाहिराती सादर केल्या. या सर्वांमध्ये घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर देण्याचे न्यायालयाने दिलेले निर्देश पाळले गेले नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ हे चिन्ह आम्हाला वापरायला दिले आहे, असा खोटा प्रचार, प्रसार करत अजित पवार गटाने दिशाभूल केली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याची हमी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत, अजित पवार गटाने घड्याळ चिन्हाचा वापर करताना हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याबाबतची बाब छोट्या अक्षरात छापली होती, ही गोष्ट शरद पवार गटाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावर अजित पवार गटाच्या वतीने बाजू मांडणाऱ्या मुकुल रोहतगी यांनी अधिक ठळकपणे संबंधित मजकूर छापला जाईल. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल, अशी हमी दिली. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पदाधिकारी, उमेदवार आणि समर्थकांना सांगितले जाईल, असे आश्वासनही दिले. याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे निर्देश दिले.