नागपूर : खैरलांजी हत्याकांडाला वीस वर्षांचा कालावधी उलटूनही त्या अत्याचाराची धग समाजाच्या मनामनात आजही खदखदत आहे. “इतका मोठा अन्याय का घडला, याचा शोध नव्या पिढीला घ्यावा लागत आहे. या घटनेचे दुःख समाजाच्या हृदयात कायम जिवंत आहे,” असे मत सामाजिक कार्यकर्ते नारायण बागडे यांनी व्यक्त केले.
आज खैरलांजी हत्याकांडात शहिद झालेल्या भोतमांगे परिवाराला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रथम आंरिमोचे नेते धर्माजी बागडे यांनी त्या भीषण घटनेची आपबिती सांगितली, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
कार्यक्रमात प्रा. रमेश दुपारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. ओबीसी नेते राजू दादा पांजरे यांनी भाषणात “जातीच्या नावाखाली झालेल्या या हत्याकांडामुळे ओबीसी–दलित भाईचारा विचारसरणीला मोठा तडा गेला. हे जखम भरून काढण्यासाठी आम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागतो,” असे ठणकावून सांगितले.
भुतल तज्ञ नामदेवराव निकोसे यांनी आपल्या मनातील दुःख व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मामासाहेब मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुण्यशील बोदिले यांनी केले.
या वेळी सुरज ढोणे, रुबीना खान, शालिक बांगर, मनोहर इंगोले, प्रकाश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.