नागपूर : वाहनाला धडक लागल्यामुळे दोन गटात उद्भवलेल्या भांडणात गोळीबार करून खून करण्यात आला. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व सातही आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.
आसीफ ऊर्फ गुड्डू शेख सादीक शेख, सामी कैफ बाबर मोहम्मद सईद बाबर, मोहम्मद आसीफ ऊर्फ कोयला मोहम्मद इक्बाल, सय्यद इमरोज अली ऊर्फ बाबा सय्यद अफसरअली, शेख अहबाज ऊर्फ बाबू शेख कलीम, शाहरूख खान ऊर्फ सोनू ऊर्फ नल्ला सलीम खान आणि आमीर खान ऊर्फ बॅाबी हिबादुल्ला खान अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मोहम्मद आबीद मोहम्मद जमील असे मृताचे नाव आहे. ४ जून २०१७ ला मृत हा आपल्या मित्रांसह उभा दुपारच्या सुमारास आरोपी सामी याच्या गाडीला धडक लागली होती. यावरून दोन गटांत वाद निर्माण होऊन मारामारी झाली. हा वाद मिटविण्यासाठी दोन्ही गटातील लोकांनी संध्याकाळी ७.३० ते ८ वाजता लष्करीबाग येथील किदवाई मशीदीजवळ मिटींग बोलवण्यात आली. या बैठकीत पुन्हा भांडण झाले. या वादातून आरोपींनी गोळीबार केला. यात मृताच्या डोक्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फैजान अख्तर मोहम्मद रफीक अंसारी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी संगनमताने खून व अवैधपणे शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या प्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एच. सी. शेंडे यांच्यासमक्ष खटला चालवण्यात आला. सरकारी पक्षाने ११ साक्षीदार तपासले. आरोपींच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, ॲड. आर. के. तिवारी, ॲड. प्रफुल्ल मोहगांवकर आणि ॲड. उदय डबले यांनी काम पाहिले. साक्षीदारांचे जबाब आणि सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.
रमजानच्या महिन्यातील थरार:
ही घटना रमजानचा महिन्यात घडली. घटनेतील मृत त्याचे मित्र व सर्व आरोपींचेही उपवास होते. त्यामुळे दुपारच्या भांडणाचा समेट करण्यासाठी उपवास सुटल्यानंतर संध्याकाळी बैठकीची वेळ ठरवण्यात आली. पण, समेट न होता दोन गटातील वाद विकोपाला गेला व आबीदचा खून झाला. रमजान महिन्यात ही घटना घडल्याने मोमीनपुरा, डोबीनगर व लष्करीबाग परिसरात तणावाचे वातावरण होते.