मुंबई : देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात पक्षाच्या वतीने भारत जोडो यात्रा काढण्यात आली. यापार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होतो आहे. मुंबई काँग्रेसने ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे.
राहुल गांधींची ही यात्रा अरूणाचल प्रदेश ते महाराष्ट्र अशी असणार आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात ‘मोहब्बत की दुकान’चा नारा दिला होता. आता दुसऱ्या टप्प्यात ते कोणता नारा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेची सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातही आम्ही पदयात्रा काढणार आहोत. पूर्व विदर्भात माझ्या नेतृत्वात पदयात्रा काढली जाणार आहे. तर पश्चिम विदर्भात आमचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पदयात्रा काढणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात, मराठवाड्यात अशोक चव्हाण, पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईत वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघणार आहे.
कोकणातील पदयात्रेत आमच्या पक्षाचे सर्वच नेते सहभागी होतील. असे आमच्या पदयात्रेचं नियोजन आहे, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली होती.