Published On : Fri, Apr 20th, 2018

बाबासाहेबांच्या संविधानाने दिला जगण्याचा हक्क : सत्यपाल महाराज

Satyapal Maharaj

नागपूर: बाबासाहेबांमुळे मी बोलू शकतो. महिला खुर्चीत बसू शकतात. बाबासाहेबांमुळेच आज महिला नगरसेविका झाल्या. महापौरपदाचा मान मिळाला. राष्ट्रपतीपदावर महिला आरूढ झाली. चपला शिवणाऱ्याची मुलगी न्यायधीश झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने ही किमया केली. प्रत्येकाला समान जगण्याचा अधिकार दिला, या शब्दात सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचे गोडवे गायले.

निमित्त होते नागपूर महानगरपालिका आणि अधिकारी, कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले जयंती समारोहानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील हिरवळीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी आमदार मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, बसपा पक्षनेते मोहम्मद जमाल, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती नागेश सहारे, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, माजी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आसीनगर झोनच्या सभापती वंदना चांदेकर उपस्थित होते.

यावेळी सत्यपाल महाराजांनी वेगवेगळ्या उदाहरणातून समाजातील वाईट चालीरीतींवर प्रहार केला. इंग्रजाविरुद्ध भारतीयांना चेतविले म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेलमध्ये गेले. राम रहीम नावाचा महाराज वेगळ्या कारणांनी जेल मध्ये गेला. आजकाल स्वार्थासाठी महाराज बनण्याची पद्धत आहे. लोक अशा भोंदूबाबांवर अंधविश्वास ठेवतात. तुकडोजी महाराजांनी सच्चा धर्म शिकविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तो कृतीत उतरविला. तुकोबाराय, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील अनिष्ट चालीरीतींवर प्रहार केला. या देशातील नागरिकांना मानवतेचा धर्म शिकविला. या समाज सुधारकांच्या विचारांना आत्मसात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांना जगण्याचा हक्क मिळवून दिला. ‘एक शिवराया, एक भीमराया, दोघांनीही झिजविली काया, आहे दोघांचाही जगी गाजावाजा, एक बहुजनांचा राजा, एक ज्ञानियाचा राजा’ या शब्दात सत्यपाल महाराज यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महती सांगितली. प्रत्येकाने आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले तर कुठलीही अडचण जाणार नाही. ‘धन गया तो कुछ नहीं गया, चरित्र गया तो सब कुछ गया’ असे सांगत भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका आणि भ्रष्टाचार करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आमदार मिलिंद माने, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, प्रबोधनकार सत्यपाल महाराज व अन्य प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महापौरांसह सर्व मान्यवरांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आले. नागपूर महानगरपालिका व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्यपाल महाराज यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेवक जितेंद्र घोडस्वार, किशोर जिचकार, उज्ज्वला बनकर, संदीप सहारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, राजू भिवगडे, अशोक पाटील, सुभाष जयदेव, महेश मोरोणे, कार्यकारी अभियंता डी. डी. जांभुळकर, राजेश हाथीबेड, इंजि. कल्पना मेश्राम, वंदना धनविजय, नीना नकवाल, सुषमा ढोरे, नंदकिशोर भोवते, विशाल शेवारे, डोमाजी भडंग, विनोद धनविजय, राजेश वासनिक, चंद्रमणी रामटेके, शशिकांत आदमने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, जयंत बन्सोड, दिलीप तांदळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. सत्यपाल महाराज यांना श्री. गजानन (हार्मोनियम), रामभाऊ (तबला), सुनीलकुमार, पवन चिंचोळकर, विजय बेदरवार, राजेश काईंगे यांनी साथसंगत केली.


विद्येच्या मंदिरात गर्दी करा
सत्यपाल महाराज यांनी बुवाबाजीवर प्रहार करत म्हटले, जेवढी गर्दी मंदिरात होते तेवढीच गर्दी तर विद्यामंदिरात केली तर भारतातील घराघरात अधिकारी निर्माण होतील. मात्र, आपल्याला हे अजूनही उमगले नाही, ही शोकांतिका आहे. आजकाल आम्ही महापुरुषांच्या जयंत्याही नाचून साजरी करतो. हीच जयंती वाचून साजरी केली तर भारताचे चित्र नक्कीच वेगळे राहील.

Satyapal Maharaj

देहदानाचा संकल्प
मनुष्याने स्वत:चा विचार करतानाच परोपकारही करावा. एक फटाका फोडला नाही तर एका गरीबाचे अंग झाकल्या जाते. या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण लग्नात फटाके फोडणार नाही, डी.जे. वाजविणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहन सत्यपाल महाराजांनी केले. माझ्या वडिलांचे नेत्रदान केले. पत्नीचे देहदान केले. माझा मुलगा डॉक्टर आहे. मी प्रबोधनाच्या निमित्ताने राज्यभर फिरत असतो. त्यामुळे मृत्यूच्या वेळी मी ज्या जिल्ह्यात असेन त्याच ठिकाणी माझा देहदान करावे, असे आपण मुलाला सांगितल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

कर भरा, विद्युत देयक भरा
नागपूर महानगरपालिकेच्या कार्याचा गौरव सत्यपाल महाराजांनी केला. नागपूर महानगरपालिका ही नागरिकांना सतत चांगली सेवा देत असते. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत. कर नियमित भरा. विद्युत देयके नियमित भरा. शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावा आणि आपले शहर सुंदर बनवा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.