Published On : Wed, Nov 28th, 2018

कालीदास महोत्सवाला रसीकांच्या पसंतीची पावती

नागपूर : देशातील पहिला महिलांचा वाद्यवृंद असलेल्या अनुराधा पाल यांच्या ‘स्त्री शक्ति’ वाद्यवृंदाने कालीदास समारोहाच्या उद्घाटनात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या तबला वादनाला मिळणारी दाद कालीदास महोत्सव हा खऱ्या अर्थाने नागपूरची ओळख झाल्याची पावती देत होता.

कविवर्य सुरेश भट सभागृहात कालीदास समारोह आयोजन समिती, पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महानगरपालिकेच्या सहयोगाने आयोजित कालीदास समारोहात आज रसिकांची भरगच्च उपस्थिती होती. या समारोहाचे उद्घाटनाला महापौर श्रीमती नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, आमदार सुधाकर कोहळे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती मुकेश चव्हाण, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, उपायुक्त सुधाकर तेलंग, के. एन. के. राव, संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी आदी उपस्थित होते.

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

खंड पडलेल्या कालीदास समारोहाच्या पूनर्जिवनाने नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली. कालीदास समारोहातील कार्यक्रमांचे आयोजन हे उच्च अभिरुचिंना प्रोत्साहन देणारे असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

संगीतातील समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे पोहोचविण्यासाठी कालीदास महोत्सवाचे आयोजन आहे. खऱ्या संगीत प्रेमींसाठी विनाशुल्क अशी सांस्कृतिक मेजवानी या समारोहात राहील व रसिकांचा प्रतिसाद पाहता दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी आश्वस्त हमी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिली.

नागपूर संत्रानगरी सोबत रसिक नगरी देखील आहे. या महोत्सवाच्या रुपाने दरवर्षी आनंदाचे रसग्रहण करण्याची संधी नागपूरकरांना मिळत असते, असे प्रतिपादन आमदार सुधाकर कोहळे यांनी केले.

नागपूर हे सांस्कृतिक शहर म्हणून उदयास येत आहे. कोणत्याही महोत्सवाला उत्कृष्ठ श्रोतृवृंद लाभतो. तेव्हा तो खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. कालीदास महोत्सव हा खऱ्या अर्थाने यशस्वी महोत्सव असल्याचे महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

सुरुवातीला श्रीमती माडखोलकर आणि संच यांनी ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ वर आधारित शास्त्रीय नृत्य सादर केले. त्यांना यावेळी श्रीमती राजेश्वरी अय्यर, शिवप्रसाद, शिरीष भालेकर, बकुल सावदे, के. व्यंकटेश्वरन यांनी साथ दिली तर श्रीमती अनुराधा पाल यांच्या ‘स्त्री शक्ति’ताल वाद्यवृंद ने रसिकांना रिझविले. सुरुवातीला नारी शक्ति गिताची विशेष प्रस्तुती त्यांनी केली. त्यानंतर उत्तम अशा ताल वाद्यवृंद श्रवणीय पर्वनी ने रसिक न्हाऊन निघाले. त्यांना रम्या घटकर, श्वाईनी दत्ता, यु. नागमणी, चारु हरिहरन् यांनी साथ दिली. त्यांच्या सादरीकरणाचा शेवट सारे जहां से अच्छा या गिताच्या ताल वादनाने झाला.

कार्यक्रमाच्या समारोपाला शास्त्रीय गायनाच्या अनुभुतीने आरती अंकलीकर यांनी रसिकांना खऱ्या अर्थाने श्रीमंत केले. आरती अंकलीकर यांच्या गायनात संवादिनीला तन्मय देवचट्टे, तबल्याला वि. भ. खांडोलकर, पखवाज ला सुरज तर शिष्या अबोली व सरगम यांनी साथ दिली. राग दुर्गातील सखी मोरे रुमझूम ही बंदीश त्यांनी पेश केली.

उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उद्घाटन पर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सुधाकर तेलंग तर सुत्रसंचालन श्रीमती रेणुका देशकर व श्रीमती श्वेता शेलगावकर यांनी केले.

Advertisement
Advertisement