Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Oct 14th, 2019

  दक्षिण-पश्चिम नागपूरच्या समस्या आजही ‘जैसे थे’.- डॉ. आशिष देशमुख

  नागपुर – स्थानिक मुद्द्यांचा विचार केला तर मागील ५ वर्षातील दक्षिण-पश्चिम नागपूरच्या जनतेच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. जागोजागी पसरलेली घाण, उघड्या नाल्या, तुडुंब भरून ओथंबून वाहणाऱ्या कचरा पेट्या, डुकरांचा सुळसुळाट, रस्ते अडवून बसणारी जनावरं! ही सारी
  दृश्य आहेत मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील, अशी घणाघाती टीका दक्षिण- पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केली.

  रविवारी सकाळी कॉटन मार्केट, शनिवारी, गुर्जरवाडी, धम्म नगर, रामबाग, इमामवाडा, जाटतरोडी, इंदिरा नगर व लगतच्या परिसरात त्यांनी जल्लोषात जनसंपर्क केला. अमर जवान शहीद स्मारक, कॉटन मार्केटची जागा मेट्रोमध्ये जाणार आहे. इथले लोक देशासाठी शहीद झालेत म्हणून ही जागा वाचविण्याची गरज आहे, अशी मागणी जनतेमध्ये दिसून आली. हात ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने महागडे गॅस सिलिंडर व महागाईमुळे त्रस्त असून कसाबसा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असल्याचे सांगितले.

  या परिसरात डास व घाणीचे साम्राज्य असून डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगर पालिकेचे आयसोलेशन रुग्णालय या परिसरात असून तिथे हव्या तशा सुविधा नाहीत. दक्षिण- पश्चिम विधानसभा क्षेत्रातील झोपड्यांचा प्रश्न आजही बिकट आहे. पट्टे वाटप झाले, पण कुणाला हे सुद्धा परिसरातील झोपडपट्टीधारकांना ठाऊक नाही. मुख्यमंत्री या परिसरातून निवडून आले आहेत परंतु ते कधीच येत नाहीत, जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यामुळे असंतुष्ट जनता डॉ. आशिष देशमुख यांच्याकडे फडणवीसांविरोधात रोष व्यक्त करत होती. हा परिसर विकासशून्य व दुर्लक्षित आहे. मोलमजुरी करून लोकांना पोट भरावे लागते, हाताला काम नाही त्यामुळे रोजगारासाठी भटकंती करावी लागते. परिसरात सर्वधर्म समभाव जोपासण्याची गरज आहे. आपसात दुरावा निर्माण होईल, असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. आपसात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करीत आहे, अशी शोकांतिका या परिसरातील जनता व्यक्त करत
  होती.

  “भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक असुरक्षितता मुस्लिमांएवढीच दलितांमध्ये निर्माण झाली. कॉंग्रेसच्या राजवटीत कधीच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली नाही. त्यामुळे दलितांची कॉंग्रेसच पसंती असली पाहिजे. संविधान जाळण्याच्या किंवा संविधानाचा अपमान करण्याच्या अनेक घटना भाजपच्या काळात झाल्या. त्यामुळे दलितांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकारी नोकऱ्यातील बहुजन आणि दलितांचे आरक्षण भाजप सरकारने जवळजवळ संपविले आहे. नावालाच आरक्षण उरले आहे. सरकारी नोकरभरतीच जवळपास बंद झाली आहे. बॅकलॉगमध्ये मोठी वाढ झाली आहे.

  त्यामुळे कॉंग्रेसचे सरकार आले तरच आरक्षण खऱ्या अर्थाने टिकेल, अशी भावना आहे. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर सत्तेमध्ये येऊच शकत नाही. ती भाजपची ‘बी’ टिम आहे, असाही दाट समज बहुजन आणि दलितांमध्ये आहे. त्यामुळे वंचित आघाडीवर पूर्ण विश्वास नाही. पर्याय केवळ कॉंग्रेस हाच आहे. भाजपला केवळ कॉंग्रेस पर्याय आहे, असा ठाम विश्वास दलित आणि बहुजनांचा आहे”, असे डॉ. आशिष देशमुख यांनी म्हटले व मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. या वेळी नगरसेवक. मनोज साबळे, प्रशांत डहाके व इतर हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी/शेतमजूर संघटनेतर्फे डॉ. आशिष देशमुख यांना समर्थन घोषित करण्यात आले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145