नागपूर : सुभाष रोडवरील म्हाडा कॉलनीतील समस्यांची पाहणी करण्यासाठी आता थेट म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारीच म्हाडा कॉलनीला शनिवारी (ता. 9) सकाळी 11 वाजता भेट देणार आहेत. यामुळे आता येथील समस्या मार्गी लागण्याची आशा रहिवास्यांमध्ये निर्माण झाली आहे.
सुभाष रोडवरील म्हाडा कॉलनीत नुकताच आमदार संदीप जोशी यांच्या उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी आणि हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या, मागण्या आणि सूचनांची माहिती आमदार जोशी यांना दिली.
या वेळी आमदार संदीप जोशी यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याशी तातडीने बैठक घेऊन यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर आज (ता. 7) म्हाडा कार्यालयात आ. संदीप जोशी यांच्या उपस्थितीत संबंधित विषयांवर बैठक घेण्यात आली. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत काही तातडीच्या कामांसाठी निर्णय घेण्यात आले असून, शनिवारी सकाळी ११ वाजता आमदार संदीप जोशी व म्हाडाचे सीईओ यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष दौरा होणार आहे. समस्यांचा थेट आढावा घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याचा मानस असल्याचे म्हाडा सीईओ यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने प्रतिसाद देणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.