Published On : Wed, Sep 13th, 2017

राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा मनपा आयुक्तांनी घेतला आढावा

Advertisement

नागपूर: महामहीम राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या २२ सप्टेंबर रोजीच्या संभाव्य दौऱ्याच्या तयारीसंदर्भात मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी बुधवार (ता. १३ सप्टेंबर) रोजी मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आढावा घेतला.

महामहीम राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद हे दौऱ्यात मनपाच्या कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करणार आहेत. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांच्या जबाबदारीचे वाटप यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलनुसार व्यवस्था आणि इतर व्यवस्थेचा आयुक्त अश्विन मुदगल यांनी आढावा घेतला. महामहीम राष्ट्रपतींचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात, मार्गातील खड्डे बुजविण्यासंदर्भात आणि आवश्यक तेथे रस्त्याचे नवीनीकरण करण्याचे आदेश आयुक्त मुदगल यांनी दिलेत.

कार्यक्रम स्थळी पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, सभागृहाच्या बाहेर रेशीमबाग मैदानावर नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था, कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची व्यवस्था, सभागृहाच्या आतमधील संपूर्ण व्यवस्था, अतिविशिष्ट आणि विशिष्ट व्यक्तींच्या पासेसची व्यवस्था आदींचाही आढावा आयुक्त श्री. मुदगल यांनी घेतला.
जबाबदारी दिलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले काम जबाबदारीने पार पाडावे आणि कविवर्य सुरेश भट सभागृह लोकार्पणाचा कार्यक्रम संस्मरणीय करावा, असे आवाहनही आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा निगम सचिव हरिश दुबे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) एस.बी. जैस्वाल, कार्यकारी अभियंता (वाहतूक) डी.डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता (स्लम) सतीश नेरळ, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, मोती कुकरेजा, के.एल. सोनकुसरे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, स्थावर अधिकारी आर. एस. भुते, झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, राजेश कराडे, सुभाष जयदेव, हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस उपस्थित होते.