नागपूर : देशातील जनता यंदा लोकसभा निवडणुकीत कोणाला विजयी करायचे म्हणून मतदान करणार नाहीत तर भाजपला पराभूत करण्यासाठी मतदान करणार आहेत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरात प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. पवारांचे राजकीय आयुष्य संपुष्टात आले, असे म्हणणाऱ्या विरोधकांना २०१९ च्या निवडणुकीत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसावे लागले होते, याची आठवणही पवारांनी करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) वर्धा मतदारसंघाचे उमेदवार अमर काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्ताने पवार नागपुरात आले होते. सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
लोकशाही आणि राज्यघटनेवर हल्ला होत आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून इंडिया आघाडी झाली आहे, असेही पवार म्हणाले. तसेच महाविकास आघाडीची अजूनही वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरु असल्याचे पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बेटाबद्दल बोलतात, पण चीनने भारताच्या हजारो चौरस फूट जमिनीवर अतिक्रमण केले त्यावर ते काही बोलत नाही. चीनच्या अतिक्रमणावर मोदींनी जाणीवपूर्वक मौन बाळगले आहे, असा आरोपही पवार यांनी केला.