Published On : Sat, Dec 22nd, 2018

विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास हिच खरी ईश्वर सेवा – प्रा. दिलीप दिवे

बालकदिन व शिक्षण सप्ताहाचा थाटात समारोप : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर: विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर या दरम्यान आयोजित बालक दिन व शिक्षण सप्ताहाचा समारोप शनिवारी (ता.22) रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.


याप्रसंगी व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षण समिती उपसभापती भारती बुंदे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, शिक्षण समिती सदस्य तौफिक इब्राहिम टेलर, नगरसेविका स्वाती आखतकर, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी प्रिती बंडेवार प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.दिलीप दिवे म्हणाले, महानगरपालिकेतील विद्यार्थी हा गरीब घरातील असतो. त्यामुळे त्याला खासगी व शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसारख्या सुविधा मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होण्यासाठी महापालिकेने अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. झोनस्तरावर विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा व त्यातून केंद्रीय स्तरावर स्पर्धा यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आल्या. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी आता इतर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे नाही. तो देखील इतर विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत तयार झालेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी सरस्वती स्तवन व स्वागत गीत सादर केले.मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार आणि क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी यांनी केले. 19 ते 21 डिसेंबर या दरम्यान झालेल्या केंद्रीय क्रीडा स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली. 10 वी व 12 वी मध्ये गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णनाणी व प्रमाणपत्र तसेच धनराशी देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ज्या शिक्षकांचा वर्ग शतप्रतिशत गुणांनी उत्तीर्ण झाला अशा शिक्षकांचा गौरव झाला. सांस्कृतिक स्पर्धेत पुरस्कार प्राप्त दोन नाटक व दोन नृत्यांचे सादरीकरण यावेेळी करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन क्रीडाधिकारी नरेश सवाईथूल यांनी तर आभारप्रदर्शन क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी यांनी केले.

24 शाळांचा प्रायोगिक तत्वावर विकास करणार
नागपूर महानगरपालिकेच्या 24 शाळा निवडून त्यांना पायोगिक तत्वावर विकसित करणार असून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श शाळा म्हणून त्यांचा गौरव होईल, असा आमचा मानस आहे, असे शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी सांगितले.