Published On : Wed, Jun 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

राज्य सरकारचा आदेश;महानगरपालिका निवडणुकीला वेग,प्रभाग रचना त्वरीत सुरू होणार!

Advertisement

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील अ, ब आणि क श्रेणीतील 10 प्रमुख महानगरपालिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेला गती देण्यासाठी 10 जून 2025 रोजी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार आणि छत्रपती संभाजीनगर या 10 महानगरपालिकांमध्ये प्रभाग रचना तातडीने सुरू केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली असून सर्व पूर्वतयारीच्या कामांना वेग दिला गेला आहे.

प्रभाग रचनेसाठी नवे निकष ठरले-
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार, ज्यामध्ये 2024 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, त्यानुसार प्रत्येक प्रभागातून किमान 3 आणि कमाल 5 सदस्य निवडले जाणार आहेत. प्रभाग रचना शहराच्या जनगणनेनुसार जनसंख्येच्या आधारावर केली जाईल.

गणिती सूत्रानुसार प्रभाग रचना-
प्रभागासाठी सरासरी जनसंख्या ठरवण्यासाठी खालील सूत्र वापरले जाईल :
(एकूण जनसंख्या ÷ एकूण सदस्यसंख्या) × प्रभागातील सदस्यसंख्या

Advertisement

तयार करण्यात येणाऱ्या प्रभागाची जनसंख्या ही सरासरीपेक्षा 10 टक्के अधिक किंवा कमी असू शकते. त्यापेक्षा जास्त फरक असेल, तर विशेष कारणांसह खुलासा द्यावा लागेल.

प्रत्येक प्रभागात 4 सदस्य, विशेष परिस्थितीत 3 किंवा 5 सदस्य-
सप्टेंबर 2022 च्या आदेशानुसार, शक्यतो सर्व प्रभाग 4 सदस्यांचे असावेत, मात्र एखादा प्रभाग 3 सदस्यांचा आणि दुसरा 5 सदस्यांचा ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. 3-3 सदस्यांचे दोन प्रभाग ठेवण्याचीही परवानगी आहे. मात्र, भौगोलिक सलगपणा राखण्याचे आणि नागरिकांना गैरसोयी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश आहेत.

प्रभाग रचनेची प्रक्रिया उत्तर दिशेपासून सुरू होऊन दक्षिणेकडे पूर्ण केली जाईल. प्रभागांच्या सीमारेषा ठरवताना रस्ते, नद्या, रेल्वे लाईन तसेच नैसर्गिक सीमा लक्षात घेतल्या जातील. कोणतीही इमारत दोन प्रभागांमध्ये विभागली जाणार नाही, याचीही दक्षता घेतली जाईल
प्रभागांचे प्रारूप नकाशे ‘गूगल अर्थ’वर तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक प्रभागातील गणना गट, जनसंख्या आणि भौगोलिक सीमा स्पष्टपणे दाखवली जाणार आहेत. हे प्रारूप मनपा आयुक्त राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी सादर करतील.
यानंतर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील, त्यावर सुनावणी होऊन अंतिम रचना जाहीर केली जाईल.

प्रभाग रचनेची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने-
प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे – मनपा आयुक्त
प्रारूपास मंजुरी देणे – राज्य निवडणूक आयुक्त
प्रारूपाचे प्रसिद्धीकरण – मनपा आयुक्त
हरकती व सूचना प्राप्त करणे – प्राधिकृत अधिकारी
अंतिम प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणे – प्राधिकृत अधिकारी (आयुक्तांमार्फत)
अंतिम रचनेस मंजुरी – निवडणूक आयोग
अंतिम रचना जाहीर करणे – मनपा आयुक्त
दरम्यान अशा प्रकारे महानगरपालिका निवडणुकीची मूळ प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत असून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.