Published On : Thu, Dec 7th, 2017

कुष्‍ठरोगाबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण होणे आवश्‍यक : जेष्‍ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे

Advertisement


नागपूर: कुष्‍ठरोगाने पिडीत असलेल्‍या रूग्‍णांकडे पाहण्‍याचा सामाजिक दृष्टीकोन बदलून या रुग्णांमध्ये आत्मबळ व स्‍वाभिमान जागृत करण्‍यासाठी समाजात संवेदनशिलता निर्माण होणे आवश्‍यक आहे, असे मत कुष्‍ठरोग क्षेत्रासंदभात कार्य करणारे आनंदवन, चंद्रपूर येथील जेष्‍ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले. स्‍थानिक हॉटेल तुली इंपेरियल येथे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्‍या क्षेत्रीय प्रचारकांसाठी आरोग्य योजनांवर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन त्‍यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नागपूर विभागाचे आरोग्‍य उप-संचालक डॉ. संजीव जयस्‍वाल अध्‍यक्षस्‍थानी तर रायपूर-पुणे क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्‍या अतिरिक्‍त महासंचालिका श्रीमती मोनीदीपा मुखर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्‍या.

हेमलकसा, दंडकारण्यासारख्‍या दुर्गमक्षेत्रात आरोग्य सेवा पूर्वी शून्‍यवत होत्या, त्‍या ठिकाणी गेल्‍या 71 वर्षापासून पद्मश्री बाबा आमटे यांच्‍या नेतृत्‍वात व त्यांच्या निधनानंतर आमटे बंधूकडून अविरत आरोग्‍य-सेवेचे कार्य चालू आहे. आनंदवनाच्‍या 28 संस्‍थेच्‍या माध्‍यमातून कुष्‍ठरोग, क्षयरोग यासारख्‍या विविध आजारांच्‍या 26 लक्ष रूग्‍णांवर उपचार केले जात आहेत, अशी माहिती डॉ. आमटे यांनी यावेळी दिली.

कुष्‍ठरोगी रूग्‍णांमध्ये असणा-या कल्‍पकता व आत्‍मबळाच्या जोरावर या रुग्णांनी आनंदवन, हेमलकसा येथे उभारलेल्‍या शाळा व विविध उपक्रमांच्या यशकथांचा प्रसार क्षेत्रीय प्रचारकांनी आपल्‍या अभियानातून करावा. त्‍यांच्‍यावर लोकशिक्षणाची मोठी जबाबदारी असून यासारख्‍या कार्यशाळा हेमलकसासारख्‍या भागातही व्‍हाव्‍यात, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

जगातील एकूण कुष्‍ठरोग्यांपैकी 60 टक्के रूग्‍ण हे भारतात आढळून येतात तर महाराष्‍ट्रातील कुष्‍ठरोग्‍यांपैकी 25 % रूग्‍ण हे नागपूर विभागात आहेत, अशी माहिती नागपूर विभागाचे आरोग्‍य उप-संचालक डॉ. संजीव जयस्‍वाल यांनी दिली. कुष्‍ठरोगावर वेळीच निदान व वेळीच उपचार होणे हा कुष्‍ठरोग निर्मूलनाचा मार्ग आहे. यासाठी क्षेत्रीय प्रचारकांनी जनजागृती करणे गरजेचे आहे, असे डॉ. जयस्‍वाल यांनी सांगितले.

रायपूर-पुणे क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्‍या अतिरिक्‍त महासंचालिका श्रीमती मोनीदीपा मुखर्जी यांनी क्षयरोग व कुष्‍ठरोगाची लागण ज्‍या क्षेत्रात होत आहे त्‍या ठिकाणी रोगप्रतिकारक क्षमतेसाठी प्रोटीन-युक्‍त पौष्टिक आहाराचे महत्‍व लोकांपर्यत पोहचवणे महत्वाचे आहे, असे सांगितले.

या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर दुस-या सत्रात ‘मिशन इंद्रधनुष्‍य’ या विषयावर राज्य सार्वजनिक आरोग्‍य संस्‍था नागपूरचे व्‍याख्‍याता डॉ. संजय चिलकर यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्‍या प्रगती (प्रोअॅक्टिव्ह गव्‍हर्नंस विथ टाइमली इंम्पिलीमिंटेंशन) या पुढाकाराखाली ‘इंटेसिंव्‍ह मिशन इंद्रधनुष्‍य (आय.एम.आय.) ‘ राबवले जात आहे. असे त्‍यांनी सांगितले. ‘कुष्‍ठरोग निवारण’ या विषयावर राज्‍य कुष्‍ठरोग प्रशिक्षण केंद्राच्‍या वैदयकिय अधिकारी डॉ. फातेमा यांनी सविस्‍तर माहिती दिली. डागा स्‍मृति शासकीय महिला इस्पितळ, नागपूरच्‍या डॉ. सुनिता लाळे यांनी ‘गर्भपात व दक्षता’ यावर मार्गदर्शन करतांना गर्भपातामुळे होणारे मातामृत्युचे प्रमाण हे 8% असते, या बाबीचा उल्लेख करुन गर्भपातासदंर्भात असलेल्या प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदयांची जनमानसात माहिती देणे आवश्‍यक आहे, असे सांगितले.कार्यशाळेच्या तिस-या सत्रात ‘क्षयरोग’ या विषयावर जिल्‍हा क्षयरोग अधिकारी डॉ. यशवंत बागडे व ‘मिशन परिवार विकास’ यावर सर्वाजनिक आरोग्‍य विभाग, यवतमाळचे राज्‍य प्रशिक्षक, श्री. मनोज पवार, यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्‍या उद्घाटकीय सत्राचे सूत्र संचालन नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. मनोज सोनोने तर आभार प्रदर्शन नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. परांग मांडले यांनी केले. या कार्यक्रमास महाराष्‍ट्र व गोवा क्षेत्रातील विविध क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.