Published On : Tue, Aug 27th, 2019

राष्ट्रवादीने सर्वधर्मसमभावासाठी भगवा हाती घेतला आहे – जयंत पाटील

तुमच्या – माझ्या डोक्यावर हुकुमशाहीचा वरंवटा हे सरकार फिरवल्याशिवाय राहणार नाही – अमोल कोल्हे

इंदापूर शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढत राष्ट्रवादीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले…

नव्या स्वराज्याचा नवा लढा…

पुणे : राष्ट्रवादीने हा भगवा हाती घेतला कारण हा सर्वांना बरोबर घेवून जाणारा आहे परंतु काहींनी या भगव्याचा गैरवापर आजपर्यंत केला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वधर्मसमभावासाठी हा भगवा हाती घेतला आहे अशी स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इंदापूरच्या जाहीर सभेत मांडली.मागच्या पाच वर्षांत भाजप सरकारने महाराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय हे सांगण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादीने काढली आहे.
लोकांना स्थानिक प्रश्नांचे भान राहिले पाहिजे याचे जागरण करत ही शिवस्वराज्य यात्रा काढत आहोत असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

जाणाऱ्यांचे आभार कारण त्यांच्यामुळे नवीन लोकांना संधी मिळाली आहे. यामुळे नवा पक्ष उभारता येत आहे असेही जयंत पाटील म्हणाले. पक्षातील पुढारी जरी गेले तरी राज्यातील जनता मात्र पवारसाहेबांच्या सोबत आहेत. वाईट दिवस आले म्हणून शरण कुणाला जायचं नसतं असेही स्पष्ट मत जयंत पाटील यांनी मांडले. चिंता करु नका पुन्हा एकदा महाराष्ट्र घडवुया तरुणांच्या हाती सत्ता देण्याचे काम करणार आहे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

तुमच्या माझ्या डोक्यावर हुकुमशाहीचा वरंवटा हे सरकार फिरवल्याशिवाय राहणार नाही – अमोल कोल्हे

राष्ट्रवादीचे युवा आक्रोश आंदोलन होणार होते परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली. अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रकार सध्या घडत आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून तुमच्या – माझ्या डोक्यावर हुकुमशाहीचा वरंवटा हे सरकार फिरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी इंदापूर येथील जाहीर सभेत दिला.

या इंदापूरच्या सभेत फायनलच करायला आलोय की, भविष्यात भाजप- सेनेचे सरकार असणार नाही असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले. कमळ जेव्हा फुलते त्यावेळी त्याच्या आजुबाजुला भुंगे खुप येत असतात परंतु भुंगे पाकळ्यांच्या आत आल्यावर कमळ पाकळ्या बंद करते आणि मग आतमध्ये गेलेले भुंगे गुदमरुन मरतात ही गोष्ट लक्षात ठेवा असा इशाराही अमोल कोल्हे यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्या लोकांना दिला. पवारसाहेबांनी सांगितले खासदारकीचा राजीनामा दे क्षणाचा विचार करणार नाही आणि राजीनामा देईन कारण मी पवारसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मला पदाचा कुठलाही मोह नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून रहायला आवडेल असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

सभेत प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपले विचार मांडले.या सभेत भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.इंदापूर शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढत राष्ट्रवादीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.शिवस्वराज्य यात्रेचा आजचा नववा दिवस असून पहिली सभा पुणे जिल्हयातील इंदापूर येथे पार पडली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दत्तात्रय भरणे , प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.