Published On : Wed, Sep 4th, 2019

महावितरणने दिले 44 बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने कामे

Advertisement

नागपूर: महावितरण मधील विद्युतिय कामे बेरोजगार विद्युत अभियंत्यांना बिना स्पर्धा थेट लॉटरी पद्धतीने देण्याचे धोरण आहे, या धोरणाच्या अनुषंगाने नागपूर शहर मंडल अंतर्गत करावयाच्या सुमारे 3.7 कोटींच्या कामाचे वाटप 44 बेरोजगार विद्युत अभियंत्यांना करण्यात आले.

बुधवार (दि. 4) रोजी महावितरणच्या प्रकाश भवन येथे आमंत्रित बेरोजगार अभियंत्यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने या कामांचे वाटप करण्यात आले असून यात वितरण फ़्रॅन्चाईझी भागातील 6, कॉग्रेसनगर विभागातील 20 आणि बुटीबोरी विभागातील 18 कामांचा समावेश आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या मार्गदर्शनात आज उपस्थित असलेल्या 44 बेरोजगार अभियंत्यांना सुमारे 3.7 कोटींच्या कामाचे वाटप करण्यात आले. यावेळी महावितरणच्या शहर परिमंदलाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, कॉग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ, कार्यकारी अभियंता (प्रशासन) विनोद सोनकुसरे यांचेसह अधिकारी, अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविकाधारक बेरोजगार अभियंत्यांना महावितरणतर्फ़े 10 लाखरुपयापर्यंतची कामे बिना स्पर्धा थेट लॉटरी पद्धतीने देण्याचे धोरण आहे, या धोरणानुसार वर्षभरात एका अभियंत्याला 10 लाख रुपयाची 5 कामे देण्यात येतात, ही कामे विहीत मुदतीत यशस्वीरित्या पुर्ण केल्यास पुढिल वर्षी 15 लाख रुपयापर्यंतची पाच कामे लॉटरी पद्धतीने दिल्या जाणार आहेत. या धोरणानुसार मागिल चार वर्षात राज्यातील शेकडो बेरोजगार अभियंत्यांना 11 हजार 482 लाखाची 1 हजार 954 कामांचे वाटप करण्यात आले असून आज यात 3.7 कोटींच्या 44 कामांची भर पडली आहे.