नागपूर : जन्मदात्या आईनेच आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. ट्विंकल रामा राऊत (२४, रा. एस ४४, बीएसके पेपर प्रोडक्ट कंपनी एमआयडीसी असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर रियांशी रामा राऊत (३) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
माहितीनुसार, ट्विंकल आणि रामा दोघेही नेहमीच एकमेकांवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन आपसात भांडण करायचे. सोमवारी २० मे २०२४ रोजी ट्विंकल आणि रामा दोघेही सकाळी ८ वाजता कंपनीत कामाला गेले. कंपनीतून दुपारी १२ ते ३ दरम्यान रामा बाहेर गेला. ट्विंकलला संशय आल्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यामुळे रामा घरी झोपी गेला. ट्विंकल दुपारी ३.३० वाजता आपली चिमुकली रियांशीला घेऊन घराबाहेर पडली.पत्नी आणि चिमुकली घरी दिसत नसल्यामुळे रामाने त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागत नसल्याने रामा घरी परत आला. त्यानंतर एमआयडीसी पोलिस रामाच्या घरी आले. ते रामाला घेऊन लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे रामाला आपली चिमुकली रियांशीचा मृत्यू झाल्याचे समजले. त्याने आपली पत्नी ट्विंकलला रियांशीच्या मृत्यूबाबत विचारना केली असता तिने आपणच रियांशीचा इलेक्ट्रिकल झोन चौक ते अमर नगर कडे जाणाऱ्या रोडवर एका झाडाखाली गळा, तोंड, नाक, छाती दाबून जीव घेतल्याचे तिने सांगितले.
एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये ट्विंकलने रियांशीचा जीव घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे रामाने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, उपनिरीक्षक महेश पवार यांनी ट्विंकलविरुद्ध कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली.