मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. रायगडमधल्या पेणमध्ये ठाकरे यांनी भाषणादरम्यान अर्थसंकल्पावर टीका केली.
हा अर्थसंकल्प म्हणजे टोप्या घालण्याचा प्रकार आहे असे ते म्हणाले. निर्मला सीतारमण यांनी जड अंतःकरणाने शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. मी अर्थसंकल्प हायलाईट्मध्ये वाचले की देशात आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी आम्ही काम करणार आहोत. मी अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो कारण त्यांनी पंतप्रधान मोदींसमोर हे बोलण्याचे धाडस केले. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हे त्या बोलल्या.
आता सरकार अमुकतमुक घोषणा करतील. फुकटात गॅस सिलिंडरही देतील. पण निवडणूक झाली की तिप्पट किंमत वाढवतील. तरुणांना नोकऱ्या देणार हे तर आम्ही दहा वर्षे ऐकतो आहोत. आम्हाला तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही. आता या सरकारला गाडायची गरज आहे. गाडायचं असेल तर आधी खड्डा खणावा लागेल, त्यात गाडून त्यावर मतांची माती टाकावी लागेल तर ते गाडले जातील. खड्डा खणण्यासाठी तुम्हाला घराघरांमध्ये जावं लागेल, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.
निवडणुका आल्यानंतर तरीही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले की देशात फक्त तुमचे सुटाबुटातले मित्र नाहीत. तुमच्या मित्रांच्या पलिकडे सुद्धा देश आहे. ज्यात तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब आहेत. दहाव्या वर्षी या चार जाती तुम्हाला कळल्या. तुमच्या बरोबरचे अदाणी म्हणजे देश नाही. सुटाबुटातले सरकार आता गरीबांकडे लक्ष द्यायला आले आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.