Published On : Tue, Feb 2nd, 2021

महापौरांनी दिली राधास्वामी सत्संग ब्यासला भेट

नागपूर: महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी (ता.२) कळमेश्वर येथील राधास्वामी सत्संग ब्यासला भेट दिली. कोव्हिडमुळे उद्भवलेल्या लॉकडाउनच्या काळात विविध प्रकारे सेवाकार्यासाठी पुढे आलेल्या शहरातील सेवाभावी संस्थांचा शनिवारी (३० जानेवारी) मनपातर्फे सत्कार करण्यात आला. या समारंभामध्ये राधास्वामी सत्संग ब्यासचे श्री. नागपाल यांनी महापौरांना ब्यास येथे भेट देण्याची विनंती केली होती. महापौर दयाशंकर तिवारी यांनी राधास्वामी सत्संग ब्यास येथे भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मनपा उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्यासह ब्यासचे पदाधिकारी उपस्थित होते.

मागच्या वर्षी शहरात कोव्हिडचा संसर्ग वाढलेला असताना मनपाद्वारे राधास्वामी सत्संग ब्यास येथे विलगीकरण व्यवस्थेची तयारी करण्यात आलेली होती. त्यावेळी आवश्यक त्या सर्व सुविधेसाठी जमा करण्यात आलेले साहित्य ब्यासमध्ये असून या सर्व साहित्याची सुद्धा महापौरांनी पाहणी केली. संबंधित सर्व साहित्याबाबत मनपा आयुक्तांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


कोव्हिडच्या काळामध्ये राधास्वामी सत्संग ब्यासतर्फे दररोज सुमारे साडेतीन हजार लोकांना सकाळचा नाश्ता, जेवण, दुपारचा नाश्ता व रात्रीचे जेवण पुरविण्याचे मोलाचे कार्य करण्यात आले. संकटाच्या काळामध्ये शहरातील इतर सेवाभावी संस्थांप्रमाणेच राधास्वामी सत्संग ब्यासचे कार्यही अतुलनीय असल्याचे नमूद करीत महापौर दयाशंकर तिवारी यांनी ब्यासच्या संपूर्ण चमूचे, पदाधिका-यांचे आभार मानले व अभिनंदन केले.