Published On : Fri, Sep 17th, 2021

‘फिरते विसर्जन कुंडा’च्या वाहनाला महापौरांनी दाखविली हिरवी झेंडी

Advertisement

कृत्रिम किंवा फिरत्या विसर्जन कुंडात गणेश विसर्जन करण्याचे आवाहन

नागपूर : नागपूर महानगरपालिके तर्फे पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने यावर्षी शहरातील सर्व तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरासमोर विसर्जन होऊ शकेल यासाठी दहाही झोन मध्ये कृत्रिम तसेच फिरते विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. १७) गांधीबाग झोनमध्ये महापौर दयाशंकर तिवारी आणि झोन सभापती श्रद्धा पाठक यांनी फिरते विसर्जन कुंडाच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले.

यावेळी कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, सहायक अधीक्षक प्रकाश गायधने, झोनल अधिकारी (स्वच्छता) सुरेश खरे, कनिष्ठ अभियंता (विद्युत) दिलीप वंजारी, स्वच्छता निरीक्षक विपीन समुद्रे, हत्तीरोग व हिवताप निरीक्षक अशोक अंबागडे, दीपक रंगारी, राजस्व निरीक्षक पी. पी. डुडुरे, आरोग्य विभागाचे योगेश नागे, आकाश समुद्रे, ज्योती काळे, रवी शेंडे, संजय भोसले आदी उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिका नैसर्गिक जलस्रोताच्या संवर्धनासाठी २०१२ पासून मोहीम राबवित आहे. त्याच धर्तीवर यंदा शहरातील तलावात गणेश विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना बाप्पाचे विसर्जन सोयीचे व्हावे यासाठी दहाही झोनमध्ये चालते-फिरते विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी मनपाच्या पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेला सहकार्य करून आपल्या बाप्पाचे विसर्जन कृत्रिम किंवा फिरते विसर्जन कुंडात करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. तसेच झोननिहाय फिरते विसर्जन कुंडासाठी टोल फ्री क्रमांक दिलेले आहे. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होईल आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धनही होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

तलाव संवर्धनासाठी गांधीबाग झोनमध्ये एकूण २६ कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गणपतीचे विसर्जन आपल्या घरासमोर पारंपरिक पद्धतीने करता यावे, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी फिरते विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या श्री गणेशाचे विसर्जन कृत्रिम किंवा फिरते विसर्जन कुंडात करा. त्यासाठी गांधीबाग झोनकरिता भ्रमणध्वनी क्रमांक ९७६७२४२९२८ वर संपर्क करा, असे आवाहन झोन सभापती श्रद्धा पाठक यांनी केले आहे.