Published On : Thu, Mar 4th, 2021

आकस्मिक भेट देऊन महापौरांनी केली अभ्यासिकेची पाहणी

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी संस्थाच्या माध्यमातून नागपूरात मोठ्या प्रमाणात अभ्यासिका सुरु करण्यात आलेल्या आहेत. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी कोव्हिडच्या नियमांखाली अभ्यासिका सुरु करण्याचे आदेश निर्गमित केले होते. या अभ्यासिकांमध्ये मुलांना शिक्षण देताना नियमांचे पालन केले जात आहे अथवा नाही हे तपासण्यासाठी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी रेशीमबाग येथील आकार फाऊंडेशनच्या अभ्यासिकेला आकस्मिक भेट देउन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेता श्री. तानाजी वनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळात तत्कालीन आयुक्तांनी शहरातील सर्व अभ्यासिका बंद केलेल्या होत्या. अभ्यासिका सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महापौरांची भेट घेतली होती. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नागपूरचे आणि नजीकच्या जिल्ह्यांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात. नजीकच्या गावात सुविधा नसल्यामुळे ते नागपुरात वसतीगृहामध्ये राहतात आणि शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची समस्या ऐकल्यानंतर महापौरांनी आयुक्तांना अभ्यासिका सुरू करण्याची सूचना दिली. आयुक्तांनी त्यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यासिका ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले.

अभ्यासिका चालविणा-या संस्थेद्वारे नियमांचे पालन केले जात आहे अथवा नाही याची तपासणी करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आकार फाऊंडेशनच्या अभ्यासिकेला आकस्मिक भेट दिली. सदर अभ्यासिकेमध्ये सर्व नियमांचे अधीन राहून वर्ग चालविले जात असल्याचे निदर्शनास आले. याबद्दल महापौरांनी समाधान व्यक्त करीत संस्थेच्या संचालकांचे अभिनंदन केले.