Published On : Wed, Oct 27th, 2021
By Nagpur Today Nagpur News

महापौरांनी केली सीएसआयआर सिकलसेल संशोधन केंद्राच्या जागेची पाहणी

Advertisement

सिकलसेल रुग्णांना एकाच छताखाली मिळणार सर्व सुविधा

नागपूर : सिकलसेल अनेमिया अभियान अंतर्गत केंद्र सरकारच्या सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजी हैद्राबाद शाखेने सीएसआयआर सिकलसेल संशोधन केंद्राचे संचालन करण्याची परवानगी नागपूर महानगरपालिकेला दिली. या अनुषंगाने बुधवारी (ता. २७) महापौर दयाशंकर तिवारी व सिकलसेल नोडल अधिकारी डॉ. दीप्ती जैन यांनी पाचपावली सूतिकागृह येथे सीएसआयआर सिकलसेल संशोधन केंद्रासाठी जागेची पाहणी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त अभिजित बाविस्कर, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी, आशीनगर झोनचे झोनल आरोग्य अधिकारी, डॉ. दीपंकर भिवगडे, पाचपावली सूतिकागृह प्रभारी डॉ. संगीता खंडाईत, डॉ. पुरी, डॉ. वाघमारे आदी उपस्थित होते.

Advertisement

सीएसआयआर सिकलसेल संशोधन केंद्र सीएसआयआरच्या निगराणीखाली नागपूर महानगपालिका व एस.एम.एम. आय वेलफेयर चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर त्यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महापौरांनी दिली.

पुढे ते म्हणाले, उत्तर नागपुरात सिकलसेल आजाराचे जास्त रुग्ण आढळून येतात. त्यामुळे येथील नागरिकांना या सिकलसेल संशोधन केंद्राचा लाभ होईल. शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील येणाऱ्या रुग्णाचीसुद्धा या ठिकाणी स्क्रिनींग करून सिकलसेलचे निदान करण्यात येईल. तसेच सिकलसेल संशोधन केंद्रात सिकलसेल रुग्णांच्या दृष्टीने सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होतील, असेही महापौर दयाशंकर तिवारी यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, केंद्र सरकार अनुदानित सीएसआयआर सिकलसेल संशोधन केंद्राचे संचालन मागील तीन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरु होते. सदर सिकलसेल केंद्राचा कालावधी समाप्त झाल्यामुळे केंद्र अन्य शहरात स्थानांतरित करण्यात येणार होते. मात्र सदर केंद्र नागपूर शहरातच रहावे यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले. यासाठी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी स्वतः जबाबदारी घेतली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने व मनपाच्या सहयोगाने सीएसआयआर सिकलसेल संशोधन केंद्र मनपा हद्दीत रहावे यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली. सदर प्रकल्प मनपाला मिळवून दिल्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार डॉ. विकास महात्मे यांचे अभिनंदन व आभार मानले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.