Published On : Thu, Feb 4th, 2021

सफाई कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांबाबत शिष्टमंडळाशी महापौरांनी चर्चा

स्थायी ऐवजदारांचा सातवा वेतन आयोग संदर्भातील प्रस्ताव शासनदरबारी पाठवणे व थकबाकी ची रक्कम तात्काळ देण्याचे महापौरांचे निर्देश

नागपूर : नागपूर शहर स्वच्छ, सुंदर दिसावे, शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सफाई कर्मचारी अविरत सेवा बजावतात. २० वर्ष सेवा पूर्ण झालेल्या या सफाई कर्मचा-यांना स्थायी करण्याचा महत्वाचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. स्थायी झालेल्या सर्व ऐवजदार सफाई कर्मचा-यांना इतर कर्मचा-यांप्रमाणेच सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळावे, याबाबतचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात यावा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच एवजदारांना थकबाकीची रक्कम टप्प्या-टप्प्याने देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाद्वारे देण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी महापौरांनी मनपा मुख्यालयात बैठक घेतली. डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, माजी महापौर संदीप जोशी, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मिलींद मेश्राम, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, कार्यकारी अभियंता अविनाश भुतकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सफाई कर्मचारी प्रतिनिधी जयसिंग कछवाह, राजेश हाथीबेड, सुनील तांबे, सतीश सिरसवान, अजय हाथीबेड, अविनाश डेलीकर, विक्की बढेल, उमेश पिंपरे, मोतीलाल जनवारे, प्रदीप महतो, सतीश डागोर, जगदीश करिहार, बाबुराव वामन, प्रकाश चमेड, नितीन वामन, दिलीप मलीक, किशोर समुंद्रे, किशोर बिरला, हरीदास ब्यास, संदीप बक्सरे, शुभम समुंद्रे, नितीन करोसिया, नवीन चमके, मंगल, ग्रौवकर, विक्की वामन, चोतमल खोटे, बबीता डेलीकर, प्रीति हजारे, नूतन शेंदुर्णीकर, शशी सारवान, अविनाश सहारे आदी उपस्थित होते.

दयाशंकर तिवारी यांनी ७ जानेवारीला महापौर म्हणून पद स्वीकारले आणि ८ जानेवारीला मनपाच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला, असे नमूद करीत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड यांनी महापौर दयाशंकर तिवारी व माजी महापौर संदीप जोशी यांचे आभार मानले व अभिनंदन केले. सर्व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग करण्यात आला असून यामधून स्थायी झालेल्या सफाई कर्मचा-यांना मात्र वंचित ठेवण्यात आले असून त्यांनाही आयोग लागू करण्याची मागणी राजेश हाथीबेड यांनी यावेळी केली. यावर महापौरांनी उपरोक्त निर्देश दिले.

लाड पागे समितीच्या शिफारशी अंतर्गत सफाई कर्मचा-यांच्या वारसांना वारसाहक्काचा लाभ देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या विषयाच्या अनुषंगाने मनपाकडे कागपत्रांची पूर्तता करण्यात आलेल्या कर्मचा-यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून कागदपत्रे प्राप्त न झालेल्यांची प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती यावेळी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. सदर विषयाच्या अनुषंगाने तत्कालीन महापौर संदीप जोशी यांच्या निर्देशानुसार समिती गठीत करण्यात आली असल्याचे राजेश हाथीबेड यांनी सांगितले. विषयाला न्याय देण्यासाठी दोन समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या. या दोन्ही समित्यांची एक समिती पुनर्गठीत करून अधिकारी व कर्मचारी संघटनेने समन्वयातून व योग्य चर्चेतून या प्रश्नावर तोडगा काढावे, असे माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

सफाई कर्मचा-यांच्या संपूर्ण प्रश्नांच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात यावी. या समितीमध्ये कर्मचा-यांच्या तीन प्रतिनिधींचा समावेश करावा व संपूर्ण प्रश्नांवर समन्वयाने मार्ग काढावा, असे निर्देश यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

याशिवाय सफाई कर्मचा-यांकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेंतर्गत बहुतांशी सफाई कर्मचा-यांना घर मिळाले नसल्याचा प्रश्न यावेळी मांडण्यात आला. संबंधित विषयाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून महापौरांनी आढावा घेतला. सदर योजना लागू करण्याबाबत जागेच्या संदर्भात आयुक्तांच्या स्वाक्षरीचे जिल्हाधिका-यांना पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

कोरोना काळात सेवाकार्य बजावत असताना मनपाचे सफाई कर्मचारी मृत पावले. या मृत सफाई कामगारांना शासनाच्या विमा योजनेचा लाभ मिळावा याबाबत योग्य कार्यवाही करण्याबाबत मागणी सफाई कर्मचारी प्रतिनिधींकडून करण्यात आली. मनपाच्या मृत सफाई कर्मचा-यांना विमा योजनेचा लाभ देण्याबाबत शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे सुद्धा निर्देश महापौरांनी यावेळी दिले. याशिवाय २९ सप्टेंबर २०१९च्या पूर्वीचे मृतक ऐवजदारांसह आजारी असलेल्या ऐवजदारांच्या वारसांनाही ऐवजदार कार्ड देण्याबाबतही कार्यवाहीचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.