अमरावती : येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला दणदणीत विजय मिळणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती असल्याचा घणाघातही बावनकुळे यांनी केला.
घुबड दिवसा काम करू शकत नाही, ते केवळ रात्रीच बाहेर पडते, कावळा केवळ दिवसा दिसतो आणि सरडा वेळोवेळी रंग बदलतो. सरड्याने गरूडाची साथ सोडली आणि त्याचे दिवस फिरले, अशा शब्दात बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी टिकणारी नसून येत्या दिवसात काँग्रेससह अन्य विरोधकांचा पराभवाचा धक्का बसणार, असेही ते म्हणाले. राज्यात भाजप बहुमताने निवडून येणार , असेही ते म्हणाले.
तसेच बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद चोरले. त्यांचे ५० आमदार सोडून गेले तरी त्यांना याबाबत कोणतीच माहिती नव्हती. मात्र आता ते अस्वस्थ झाले असून येत्या काही दिवसांत त्यांनी मुंबई महापालिकेत केलेला भोंगळ कारभार बाहेर पडणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.