मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीत संख्याबळ कमी असल्याने हे पद काँग्रेसच्या वाट्याला गेले.
त्यानंतर काँग्रेसमध्ये विरोधी पक्ष नेता कोण असणार याबाबत हालचाली सुरु झाल्या होत्या. अखेर काँग्रेसने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची निवड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून केली आहे.
राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी दुसऱ्यांदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः वडेट्टीवार यांनी फेसबुक पेजवर आनंदाची बातमी विरोधी पक्षनेता होणार, अशी पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. अखेर काँग्रेसकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याबाबत पत्र दिले जाईल. त्यानंतर, विधानसभा अध्यक्ष काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीची घोषणा करणार आहेत.