नवी मुंबई : महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक गुंतवणूक व रोजगाराच्या संधी उपलब्ध असणारे राज्य आहे. राज्यात आर्थिक गुंतवणूक वाढण्याचे कारण म्हणजे राज्य पोलीस दलाने राखलेली उत्तम कायदा व सुव्यवस्था होय, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.
राज्य पोलीस दलाच्या 30व्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई येथे करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
नवी मुंबई येथील सेंट्रल पार्क मधील ॲम्फि थिएटरमध्ये आयोजित कार्यक्रमास गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार मंदाताई म्हात्रे, प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अपर मुख्य सचिव गृह सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतिश माथूर, अपर महासंचालक प्रज्ञा सरवदे, विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंह, कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या संबोधनात उत्तम क्रीडा स्पर्धा आयोजनाबद्दल कौतुक करुन श्री.फडणवीस म्हणाले की, पोलीस हे अत्यंत तणावात काम करतात. कायदा सुव्यवस्था उत्तम राखून आपल्या जिवीत व मालमत्तेचे रक्षण करतात. त्यांना विरंगुळा मिळतानाच शिस्तही बळावली पाहिजे यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे आहे. यातून पुढे येणाऱ्या पोलीस खेळाडुंनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम यश संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी पोलिसांनी विकसित केलेले सिडकोचे मैदान पोलिसांना उपलब्ध करुन देण्याबाबत सिडकोला योग्य ते निर्देश देऊ, असे श्री.फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. या मैदानावर खेळाडुंसाठी उत्तम सुविधा निर्माण केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक गुंतवणूक व रोजगार संधी असणारे राज्य आहे. याला कारणीभूत इथल्या पोलिसांनी राखलेली उत्तम कायदा सुव्यव्यस्था आहे. पोलीस दल हे एका परिवाराप्रमाणे असून परिवारातील सर्व सदस्य एकमेकांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. पोलिसांच्या घरांबाबत शासनाने ठाम भूमिका घेतली. येत्या तीन वर्षात पोलिसांना चांगली घरे उपलब्ध होतील. तसेच पोलिसांचे स्वतःचे घर असावे यासाठी त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. पोलीस दलाच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे, असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील असा विश्वास व्यक्त करुन श्री.फडणवीस म्हणाले की, खेळातील सहभाग महत्त्वाचा असतो. यामुळे खिलाडुवृत्ती वाढीस लागते. खेळाडू व्यक्तीगत जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर अयशस्वी होत नाही, त्यामुळे पोलिसांनी खेळाचे महत्त्व जपावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गत वर्षी औरंगावाद येथे झालेल्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतील विजेता बिपीन विजय ढवळे या कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडुने आणलेली क्रीडा ज्योत वर्षा नामदेव भवारी या महिला खेळाडूच्या हस्ते सभास्थानी आणली आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करुन स्पर्धांचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेचे मानचिन्ह असलेले डॉल्फिनचे चित्र रंगीत फुग्यांसोबत हवेत सोडण्यात आले. यावेळी गोविंद राजू वंजारी व तेजस गजानन पाटील या पाल्यांना आयआयटी मधील उच्च शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच दिवंगत पोलीस कर्मचारी यशवंत धोंडू शेंगाळे यांच्या पत्नी श्रीमती हिरा शेंगाळे यांना 30 लाख रुपयांच्या विमा रकमेचा धनादेशही प्रदान करण्यात आला. या योजना पोलीस कल्याण निधीतून राबविल्या जातात.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस दलातील गायक कलावंत संघपाल तायडे (जळगांव) व राजेश जाधव (बुलढाणा) यांनी सादर केलेल्या गीत गायनाला उपस्थित मान्यवरांसह साऱ्यांनी दाद दिली. यावेळी रुद्राक्ष ग्रुपतर्फे समुह नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे व विजय कदम यांनी केले.