Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Nov 27th, 2018

  नागपूरच्या शाश्वत विकासासाठी कालस्रू शहराचे मार्गदर्शन महत्त्वाचे : नंदा जिचकार

  जर्मन शिष्टमंडळाचे महापौरांनी केले स्वागत : दोन दिवसीय कार्यशाळेत घेणार सहभाग

  नागपूर: भारतात जी शहरे ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत निवडण्यात आली आहेत त्यात नागपूर शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने सुरू आहे. येथील अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर ऊर्जानिर्मिती आणि परिवहनासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. या कार्यात जर्मनीतील कार्लस्रू शहराचा आदर्श नागपूरने समोर ठेवला आहे. पुढील प्रकल्पांसाठी आणि चांगल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कार्लस्रू शहरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन नागपूरसाठी महत्त्वाचे राहील, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

  स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या ‘सिटी टू सिटी पेअरिंग’ कार्यक्रमांतर्गत नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू शहरांमध्ये झालेल्या करारानुसार कार्लस्रू येथील शिष्टमंडळ नागपुरात दाखल झाले आहे. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे आयोजित ‘मोबीलाईज युअर सिटी’ या कार्यशाळेत ते सहभागी होणार आहे. मंगळवारी (ता. २७) मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयातील सभागृहात शिष्टमंडळासाठी स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या स्वागतपर भाषणात बोलत होत्या.

  यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, एनएसएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, एनएसएससीडीसीएलच्या संचालक मंगला गवरे, एनएसएससीडीसीएलचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश दुफारे, विजय बनगीरवार, देवेंद्र महाजन, मेट्रोचे सुहासकुमार सिन्हा, सहमहाव्यवस्थापक महेश गुप्ता, महाव्यवस्थापक उदय घिये उपस्थित होते. कार्लस्रू शिष्टमंडळात कार्लस्रूच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे इनोव्हेशन हेड राफ ईकॉर्न (Mr. Ralf Eichhorn), कार्लस्रू डिजीटलचे स्टीफन बुल्ह (Mr. Steffen Buhl), कार्लस्रू अर्बन प्लानिंग डिपार्टमेंटच्या प्रा. डॉ.

  इंग अँक कारमन-वोएस्नर (Ms Prof. Dr.-Ing. Anke Karmann-Woessner), युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायंसेस इंस्टिट्यूट ऑफ ट्राफिक ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रा. डॉ. इंग जान रील (Prof. Dr.-Ing Jan Riel), स्ट्रेटॅजी आर्किटेक्ट ऑलिवर विल (Mr. Oliver Will), कार्लस्रूच्या पुणे इनोव्हेशन कार्यालय प्रमुख श्रीमती इरिस बेकर (Ms. Iris Becker), इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशनचे आशीष पंडित, आशीष वर्मा, यांचा सहभाग आहे.

  यावेळी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचे स्वागत नागपूर शहराच्या वतीने महापौर नंदा जिचकार यांनी केले. एनएसएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नागपूर आणि कार्लस्रू शहरामध्ये ‘सिटी टू सिटी पेअरिंग’ अंतर्गत झालेल्या करारासंदर्भात माहिती देत दोन्ही शहरांमध्ये होत असलेल्या विविध प्रकल्पांच्या माहिती व मार्गदर्शनाच्या देवाणघेवाणीसंदर्भात माहिती दिली. यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी स्वागतपर भाषणात जर्मनीतील बॉर्न शहराचा उल्लेख करीत तेथील वाहतूक व्यवस्थेने आपण प्रभावित झाल्याचे सांगत तशी वाहतूक व्यवस्था नागपुरात व्हावी, असे सांगत कार्लस्रू शिष्टमंडळाच्या नागपूर भेटीने अनेक नव्या प्रकल्पांना बळकटी प्राप्त होईल, असे सांगितले.

  बुधवारी विविध प्रकल्पांचे सादरीकरण

  कार्लस्रू शहराचे शिष्टमंडळ तीन दिवस नागपुरात असून नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे बुधवार २८ नोव्हेंबरपासून मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित कार्यशाळेत सहभागी होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता एनएसएससीडीसीएलचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे स्मार्ट सिटीवर सादरीकरण करतील. सकाळी ११ वाजता मनपाच्या वाहतूक विभागाचे व्यवस्थापक शिवाजी जगताप नागपूर शहर बस सेवेचे (आपली बस) सादरीकरण करतील. यानंतर सकाळी ११.३० वाजता वाहतूक अभियंता आसाराम बोदिले नागपूर शहराच्या व्यापक वाहतूक नियोजनावर सादरीकरण करतील. दुपारी १२ वाजता महामेट्रोच्या वतीने सादरीकरण होईल. २९ नोव्हेंबर रोजी सुद्धा विविध प्रकल्पांचे सादरीकरण होईल. दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान कार्लस्रूचे शिष्टमंडळ मिहानसह नागपुरातील विविध प्रकल्पांना भेटी देतील. कार्यशाळेचा समारोप ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होईल.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145