परतीच्या पावसाने शेतीचे झालेले नुकसान पालकमंत्री आज घेणार आढावा

Advertisement

नागपूर: गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, मोसंबी व भाजीपाला या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्या दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात केले आहे.

या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहे. तसेच नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा 3-4 दिवसात करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले होते. या आढावा बैठकीत प्रत्येक पिकाच्या नुकसानीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल तयार झाला की नाही याची माहिती संबंधित विभागाला सादर करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील रामटेक, मौदा, कामठी या भागातील धानाचे पिक झोपले आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काटोल, नरखेड, कळमेश्वर या भागातील संत्रा, मोसंबी आणि कापूस, ज्वारी, सोयीबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यादृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण आहे.