Published On : Mon, May 10th, 2021

ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते वितरण

नागपूर :- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इडंस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर ,पुणे यांच्याकडून जिल्हयाला 42 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व 5 बाय-पंप भेट देण्यात आले आहेत. त्यांचे वितरण पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते आज बचतभवन येथे करण्यात आले.

ग्रामिण भागासाठी 12 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन जिल्हा आरोग्य अधिकारी दिपक सेलोकार यांना देण्यात आले. तर भाऊसाहेब मुळक आर्युवेद महाविदयालय (केडीके) नंदनवन, बुटीबोरी व उमरेड येथील महाविद्यालयाला प्रत्येकी 10 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर वितरीत करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रात लवकरच सुरू होणाऱ्या कोविड केंद्राला 5 बाय-पंप भेट देण्यात आले. या उपकरणांमुळे कोवीड रूग्णांवर उपचार करण्यासाठी मदत होईल.


जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, डॉ. अजय केवलीया यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत शिपाई किशोर बाबुराव साळवे यांचा कर्तव्यावर असतांना कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यु झाला. त्यांच्या पत्नी भारती साळवे यांना आज 50 लक्ष रूपयांच्या सानुग्रह सहायाचा धनादेश पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आला.

आज जिल्हयात एकूण 115 मेट्रीक टन ऑक्सिजन प्राप्त झाला असून त्यामधील 72 मे. टन खासगी व शासकीय रूग्णालयांना तर 27 मे. टन प्लांटला वितरीत करण्यात आला. आज 3 हजार 998 रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त झाले.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून केंद्रीय नियंत्रण कक्षाची पाहणी
कोवीड रूग्णांना बेड व अन्य सुविधांची माहिती देण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्षाला आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली. आमदार दुष्यंत चतुर्वेदी, मनपाचे विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त, राधाकृष्णन. बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यावेळी उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे या कक्षाची निर्मीती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसाठी कोवीड रुग्णालयांमध्ये खाटांची सुविधा, उपलब्ध करुन देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोवीड रुग्णालयांमध्ये रेमडीसिवीर, ऑक्सिजन पुरवठ्याकरीता देखील वेगळा नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

पालकमंत्री यांनी नियंत्रण कक्षात कार्यरत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांना रिअल टाइम माहिती देण्याची सूचना केली. आयुक्तांनी त्यांना नियंत्रण कक्षाच्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली.

मनपा मुख्यालयात सुरु करण्यात आलेला हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून तीन शिफ्टमध्ये तज्ज्ञांची चमू उपलब्ध आहे. आता कोणत्याही शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात (80% क्षमतेचे) अतितातडीचे रुग्ण वगळून थेट रुग्णाला दाखल करता येणार नाही. या कक्षातून बेड दिल्यानंतरच रुग्णाला दाखल करता येईल. शिवाय या कक्षातून पाठविण्यात आलेल्या कोणत्याही रुग्णाला दाखल करण्यास रूग्णालयाला नकार देता येणार नाही.

नियंत्रण कक्षाचा टेलिफोन क्रमांक 0712- 2567021 या क्रमांकाच्या 10 फोन लाईन उपलब्ध आहेत. तर 7770011537, 7770011472 या क्रमांकावर व्हॉटसॲप करता येईल. रुग्णाचा SPO2 लेवल, एचआरसीटी, आरटीपीसीआर रिपोर्ट या क्रमांकावर व्हॉटसॲपवर पाठविता येईल. यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने लवकरात लवकर रुग्णालयात उपलब्धतेनुसार बेड उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. संबंधीत रूग्णालयाला ही याची पूर्वसूचना दिली जाते.

अतिगंभीर स्वरुपातील कोविड रुग्ण दाखल केल्यास एक तासाच्या आत नियंत्रण कक्षाला माहिती देणे संबंधीत रुग्णालयास बंधनकारक आहे. तथापी या सवलतीचा दुरुपयोग केल्याचे लक्षात आल्यास संबंधीत रुग्णालय कारवाईस पात्र राहील, असाही इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाच्या कामी वुई सेवन केयर फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य मिळत आहे.