Published On : Thu, Dec 5th, 2019

भव्‍य रंगभूमीची कवाडे खुली झाली

Advertisement

अरुण नलावडे व सुशांत शेलार यांनी केले महानाट्याचे कौतुक

आम्‍ही छोट्या आणि चार भिंतीमध्‍ये बंद असलेल्‍या रंगमंचावर काम करणारे कलाकार आहोत. प्रकाशात झोत पडला की संवाद म्‍हणणा-या आमच्‍या कलाकारांसाठी महानाट्याचा हा अनुभव समृद्ध करून गेला. आमच्‍यासाठी भव्‍य रंगभूमीची कवाडे त्‍यानिमिताने खुली झाली, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे आणि सुशांत शेलार यांनी व्‍यक्‍त केल्‍या.

खासदार सांसकृतिक महोत्‍सवात मागील दोन दिवसांपासून सहाय्य फाउंडेशन प्रस्‍तुत ‘झांशी की राणी – रणरागिणी’ हे झांशीची राणी लक्ष्‍मीबाई यांचा जीवनपट उलगडणारे महानाट्य सुरू आहे. या महानाट्याचा सलग तिसरा प्रयोग आज, गुरुवारी सादर करण्‍यात आला. महानाट्याला नागपूरकर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेला प्रतिसाद पाहून हे दोघेही कलाकार खुश आहेत.

महानाट्याचा जनक असलेल्‍या नागपूरमध्‍येच ‘रणरागिणी’ या महानाट्याची निर्मिती झाली आहे. महानाट्याचे लेखन युवा नाट्यलेखक अॅड. गौरव खोंड यांनी पहिल्‍यांदाच केले असून नचिकेत म्‍हैसाळकर या युवा दिग्‍दर्शकाने पहिल्‍यांदाच इतक्‍या समर्थपणे महानाट्याच्‍या दिग्‍दर्शनाची जबाबदारी आपल्‍या खांद्यावर पेलली आहे.

या महानाट्यातील 80 टक्‍के कलाकार, बॅकस्‍टेज आर्टीस्‍ट पहिल्‍यांदाच महानाट्यामध्‍ये काम करीत आहेत, हे विशेष. या महानाट्याचे आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे यात मराठी चित्रपट, मालिका व नाट्य क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत ज्‍येष्‍ठ अभिनेते अरुण नलावडे, अभिनेते शेलार यांच्‍यासोबतच, मुंबईत आपल्‍या अभिनयाची छाप पाडणारे व सध्‍या माझ्या नव-याची बायको मालिकेतून घराघरात पोहोचलेले विदर्भाचे देवेंद्र दाडके, ‘होणार सून मी त्‍या घरची’ फेम राधिका देशपांडे आणि विपुल साळुंके हे मुंबई, पुण्‍याकडील स्‍टार कलाकार महानाट्यात काम करीत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू विनायक देशपांडे, रवी कासखेडीकर, गिरीश देशमुख, मधूप पांडे, राजेश बागडी, चेतन कायलकर, आशिष वादिले, विलास त्रिवेदी, रामभाऊ अंबुलकर यांची गुरुवारी प्रमुख उपस्थिती होती.

थ्रीलिंग अनुभव
आम्‍ही 28 फूटाच्‍या रंगमंचावर खेळणारी माणसे आहोत. त्‍यापेक्षा तिप्‍पट मंचाचे हे महानाटय, त्‍याच्‍या भव्‍य मंचावर पोशाख, टोपी आदी सांळाळत, मंचावरचे खाचखळगे सांभाळत करावे लागत आहे. नाटक हे असे असते, हा अनुभव पहिल्‍यांदाच घेतला. सुरुवातीला खूप टेंशन होते पण नंतर मजा आली. हा माझ्या थ्रीलिंग अनुभव ठरला, असे अरुण नलावडे म्‍हणाले. या महानाट्याला बरीच मागणी येत असून त्‍याचे आणखी काही प्रयोग करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

वेगळ्या रंगभूमीची ओळख
महानाट्य म्‍हणजे काय असते हे माहितीच नव्‍हते. वयाच्‍या बाराव्‍या वर्षापासून रंगभूमीवर काम करतो आहे. पण या महानाट्याने मला एक नव्‍या भव्‍य रंगभूमीची ओळख करून दिली. एक वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्‍ध करून दिला. सर्वकाही रेकॉर्डेड असल्‍यामुळे सुरुवातीला टेंशन आणि उत्‍सूकताही होती. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आम्‍ही सुखावून गेलो. एवढा मोठा मंच, त्‍यावरचे कलाकार सांभाळणे, हे महाजिकरीचे काम आहे, असे सुशांत शेलार म्‍हणाला.

आज महोत्‍सवात

शैलेश बागडे प्रस्‍तुत ‘डॉ. भीमराव आंबेडकर’ महानाट्य ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर सायंकाळी 6 वाजता होणार आहे.