| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 5th, 2018

  प्रजासत्ताक दिन शिबिरात उत्तम कामगिरी करणाऱ्या एनसीसी चमूला राज्यपालांची शाबासकी

  मुंबई: यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या राज्याच्या एनसीसी चमूला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी राजभवन येथे निमंत्रित करून कौतुकाची थाप दिली.

  यावर्षी 72 मुले व 39 मुलींचा समावेश असलेल्या महाराष्ट्र एनसीसी चमूने 6 वैयक्तिक तसेच 15 सांघिक पारितोषिके प्राप्त केली.

  सोळाव्या शतकापर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा वाटा एक चतुर्थांश होता. परकीय राजवटीमुळे देशाचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र भूमीनेच परकीय सत्तेला सर्वाधिक प्रखर विरोध केला होता. युवकांना याची आठवण करून देताना, युवकांनी राष्ट्रनिर्माण कार्याला हातभार लावल्यास भारत पुन्हा एकदा जागतिक महासत्ता होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

  या चमूमध्ये विशेष वैयक्तिक कामगिरी केलेले कॅडेट पुढीलप्रमाणे आहेत : ऑल इंडिया बेस्ट कॅडेट (आर्मी) कॅडेट गुरजीत सिंग, (एअर फोर्स) कॅडेट सर्वेश नावंदे, प्रजासत्ताक दिन परेड मुलींच्या पथकाचे नेतृत्व कॅडेट पूजा निकम, ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प नेमबाजीमधील सुवर्णपदक कॅडेट देविका सराफ, गिर्यारोहण अभ्यासक्रमात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी कॅडेट कस्तुरी सावेकर, भारतीय नेमबाजी संघामध्ये निवड कॅडेट तेजश्री कांबळे.

  एनसीसीच्या चमूने यावेळी देशभक्तीपर समूह गीते तसेच शास्त्रीय नृत्य यांचा समावेश असलेला एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल गजेंद्र प्रसाद, उपमहासंचालक ब्रिगेडियर जगदीप सिंग तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145